गुरुवार, १६ मार्च, २०१७

जगत पसारा





अफाट पसारा 
तुझा विश्वंभरा 
शून्याचा गाभारा 
भरलेला ।।

अगणित योनी 
जन्म अक्षौहोनी
घडेना मोजणी 
ब्रह्मादीका।।

क्षणात घडती 
क्षणात मोडती
युगे लक्ष्यावधी 
तुझी इथे ।।

खेचर भूचर 
चर नी अचर 
किती जलचर
वनचर ।।

इवलीसी धरा
मज आकळेना 
लक्ष तारांगना
कैसे जाणू।।

अथांग अंधारी
कैसा घडे स्फोट 
विश्व हे प्रकट 
कैसे होय ।।

आधी तो अंधार 
कुणी निर्मीयला 
कुणाला सुचला
संकल्प तो ।।

पडता गहन
मनास हे प्रश्न 
जीणे अर्थशून्य 
वाटू लागे।।

चित्त व्याकुळते 
दिड्मुख होऊन 
जातसे शरण
तुज पूर्ण ।।

उत्पत्ती उत्पका
जगत पालका
विनाश नाशका
दत्तात्रेया ।।

विक्रांत अजाण 
प्रश्न गुंडाळून 
चरणी बसून 
स्वस्थ झाला ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...