साहस
******
ओठावरी कुणाच्या ते शब्द होते अडलेले
मनी होते युद्ध तरी
पराभव ठरलेले ॥
नको नको म्हणे मन
बंधनात अडकले
उडायचे होते पण
पंख कुणी कापलेले ॥
तेच भय पुरातन
अणुरेणू व्यापणारे
तहानले प्राण परी
पाणी नको म्हणणारे ॥
सुरक्षेची जीत झाली
साहसाचा जीव गेला
जी जी म्हणे धनी कुणी
ठरलेल्या शृंगाराला ॥
मेले जरी मन तरी
जगणे ते प्राप्त होते
अन खुळे स्वप्न निळे
तुटलेली वाट होते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा