गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

हिरवी पानं


हिरवी पान
******
तशी तर असंख्य हिरवी पानं 
लहरत असतात 
जीवनाच्या वेलीवर 
आणि प्रत्येक पानाला
जगायचं असतं
कोवळ्या पोपटीपणातून 
कच्चं हिरवं व्हायचं असतं
ऋतुच्या सोहळ्यात 
डोलायचं असतं

तरीही ती गळून पडतात 
खाली कोमजलेल्या अंगानं 
अकाली ओघळून
आपलं हिरवेपण अंगावर पांघरून 

तेव्हा जीवनाचे तज्ञ असतात 
वाद घालत मोठमोठ्यानं
मुठी आवळत टेबलावर आपटत
आपली मत पुन्हा पुन्हा मांडत
अन
दिवाणखान्यातील कृत्रिम बागेत 
आणि गप्पा ठोकत 
संवर्धनाच्या समानतेच्या 
सुख समाधानाच्या 
हरितक्रांतीच्या 
तेव्हा वाऱ्यानं वाहून 
आलेली ती पानं
सेवेकरी असतात झटकून टाकत 
बाहेरच्या बाहेर 
निर्विकार मनानं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...