सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

गिरनार नाद

गिरनार नाद
*********
टप टप टप 
ओघळते पाणी
गोमुख वाहणी
हलकेच॥

फडफड फड
उडते पाखरू 
सर्वांग सुंदरू 
अनायसे ॥

सळसळ सळ
पानाचे संगीत 
पडते कानात 
अलगद ॥

खळ खळ खळ
इवला निर्झर 
मग्न तालावर 
स्वतःचाच ॥

घूम घूम घूम 
घोंगावतो वारा 
वादळ भोवरा 
कपारीत ॥

चिरचिर चिर 
अनाम चित्कार 
रोम देहावर
उठतात ॥

खट खट खट 
चालणारे पाय 
जीवन उपाय 
शोधावया ॥

विक्रांत नादात 
अंतर बाहेरी 
अज्ञात कुहरी 
हरवला ॥

दत्त दत्त दत्त 
येतसे ओठात 
गिरनार वाट 
पाऊलात ॥
*******

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...