बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

भिंत

Dear friends ,After reading  yesterdays fierce discussion 
on cast and reservation on my medical college group .I have written these few lines .
Hope some of you will agree with me .

भिंती 
***
कधी दृश्य होत्या 
कधी अदृश्य होत्या 
भिंती सततच होत्या 
भिंती रुततच होत्या 

लाख यत्न केले कोणी 
अन धडका मारल्या किती 
पण कधी पडल्याच नाहीत 
कधी हलल्याच नाहीत 
या भिंती

रंग बदलतो या भिंतींचा 
गिलावाही बदलतो 
नक्षी ही बदलतात कधी 
कधी बनतात त्यात 
नवीन दरवाजे 
पण सक्त कुलुपाचे 
परवानगीच्या फर्मानाचे 
त्याने अधिकच वाढतो 
रुबाब या भिंतींचा 
अधिकच घट्ट होतात त्या भिंती
असे वाटते 
कधी पडणारच नाहीत या भिंती 

काल तिकडून उभारल्या जात होत्या भिंती 
आज इकडून उभारल्या जात आहेत भिंती 
सहस्त्रावधी अवमानित 
आत्म्यांचा आक्रोश जागा करीत 
पण . . पाडल्या जात नाहीत या भिंती

सत्ता श्रेष्ठत्व उच्चत्व 
यांचाच खेळ हा शेवटी 
पैसा भुक मृत्यू भीती 
हीच इथली खरी शस्त्र असती 
गांधीलमाशी मधमाशी 
लाल मुंगी काळी मुंगी 
युद्ध येथे रोजच चालती

कधीतरी या भिंतीस
पाडले होते खिंडार 
नाथ मच्छिंद्र गोरक्ष यांनी 
कबीरादी ज्ञानेश्वरांनी 
नाहीच तुटली ही भिंत तरीही 
देव झाले तेच 
मांडले गेले या भिंतीवरती 
खरंच का तुटत नाहीत या भिंती ?

मान्य आहे सगळ्यांनाच 
किती अनैसर्गिक आहेत या भिंती 
किती लाजिरवाण्या आहेत या भिंती 
पण या भिंतींच्या अलीकडे 
आहे एक संस्कृती 
अन पलीकडे आहे दुसरी संस्कृती 
काहीही करून त्यांना 
ती टिकवायची आहे 
आणि काहीही करून 
यांना ती जाळायची आहे 
मग सांगा बरे कशा तुटतील या भिंती 

खरे तर 
या जगात संपूर्ण टाकाऊ 
असे काहीच नसते 
मातीतच मिसळलेले सोनेही असते 
वेचले तर जीवन समृद्ध होते 
फेकले तर दारिद्र्य भोगावे लागते 

कदाचित तुटतीलही या भिंती 
काळौघात विरुनही जातील 
पण आज तरी या भिंतींचे
अस्तित्व स्वीकारत जगत 
तिच्या दार खिडक्यातून 
आत बाहेर जात 
देणे घेणे करीत
जगण्यातील तिचे अस्तित्व
 "गौण करण्यात "
शहाणपण आहे 
नाही का?

*******
डॉ.  विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...