अनामिकत्व
**********
अनामिक भीतीच्या बुडबुड्यात
आसक्तीच्या क्षणिक पापुद्र्यात
पोकळ जीवनाचे ओझे घेऊन
जगतो आम्ही अर्थ शोधत
आपल्या असण्याचा आणि नसण्याचा
काही मृत आणि काही अमृत पुस्तकांमधून
शब्दांच्या अगणित राशीमधून
झेपणारा अन कळणारा सारांश गोळा करीत
सरपटतो चाचपडतो आम्ही
आपण असल्याची खात्री करत
चालूच ठेवतो शब्दांचा हा प्रवास
त्या त्यांच्या शब्दांना पाठ करून
घोकून घोकून
कधी देतो मोठेपण . .व्यापकत्व
आपल्यात असलेल्या भावनांना
त्यांना प्रेमाचे नाव देऊन
वा त्यागाचे लेबल लावून
आणि शोधतो जगण्याला एक कारण
त्याच्या सा-या खोटेपणाकडे
चक्क कानाडोळा करून
या साऱ्या शोधा-शोधीत टाकाटाकीत
कुणाला भेटतो दत्त
कुणाला कृष्ण
तर कोणाला भेटते भवानी
कुणाला साईबाबा
कोणाला समर्थ कुणा ज्योतिबा खंडोबा
मग आपल्याला भेटलेल्या आधारास
घट्ट पकडून पक्के बिलगून
जातो आम्ही जीवन जगून
खरेतर अनामिक असतो आपण
जगतो अनामिक म्हणून
आणि मरतोही अनामिक होऊन
पण या अनामिकत्वाला भेदून
छेद देऊन
जाण्याची लालसा
अमरत्वाची तीव्र इच्छा
होत असते कदाचित जन्माचे कारण
*********
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा