शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

काही वेदना

वेदना
*****
या डॉक्टरी पेशात
मी पहिल्यात
असंख्य वेदना
तरीही प्रत्येक वेळी
मला दिसली
तेवढीच धारधार
प्रत्येक वेदना
मी पाहिली
देहाच्या वेदनेने
तडफडणारी माणसे
ठेचाळलेली रक्ताळलेली
थरथरणारी माणसे
घट्ट पोट धरून
डोके आवळून
विव्हळणारी माणसे 
आणि एखाद्या वोवेरान
एखाद्या बस्कोपेन
वा एखाद्या पँनफोर्टीने
स्वस्थ होणारी माणसे 
कृतज्ञतेने हसणारी
धन्यवाद देणारी माणसे
वेदनेचे परीहारीत होणारे हे रूप
देते एक अर्थ माझ्या जीवनाला .....
कधी पाहीलीत मी
जीवलगांच्या जाण्याने
साऱ्या विश्वाची वेदना
डोळ्यात भरून
काळीज फाटणारा
आक्रोश करणारी माणसे
या जगाची अन जगण्याची
सारी गणिते क्षणात
चोळामोळा करणारी ती वेदना
तिचा इलाज
तिचा उतारा
मला कधीच भेटला नाही
त्या असंख्य अनाम
आक्रोशांनी अन वेदेनेनी
भरलेले माझे हृदय
मी नेवून बुडवले
कधी संगीतात
कधी सुखभोगात
कधी ग्रंथात संतचरित्रात
तर कधी मंत्र पठणात
अगदी वेदांतात
अन उपनिषदातही
तरीही ती वेदना तशीच आहे
अविचल कोरडी सनातन ...
कधी मी पहिले कुणाला
कित्येक प्रहर कळा सोसतांना
तन मन पिळवटून निघतांना
जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर
स्वत:ला लोटतांना
कुशीतील चैतन्य
जीवनात सोडतांना
अन वेदनेला आलेले फुल
अलगद वेचतांना
पाहिले एक अपूर्व समाधान
डोळ्यात ओघळतांना
अगदी कडेलोट होवूनही
वेदना अशी हसतांना ...
***
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...