बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तूर्त एवढेच कळावे

 





कधी उंच उंच नभात
गर्द कृष्ण मेघात
हलक्या विरळ अस्तित्वाचा
इवला कण होत
तर कधी कडेलोटातील गर्जनेत
धबाबा कोसळणाऱ्या प्रपातात
साऱ्या विश्वाला दहशत घालत
जीवन होते वाहत

कधी स्वभान विसरून
साऱ्या विश्वात समरस होवून
कधी स्वतःत काठोकाठ भरून
मी पणाची जाणीव
क्षणोक्षणी जागी ठेवून
होते
सतत गतिमान
जाणिवेच्या कोषात गुरफटून

या अगोदरचे कितीतरी ऋतू
कितीतरी वाटा
कितीतरी प्रवास
आहेत पेशीपेशीत अजून
स्मृती पुंजके होऊन
गुणसूत्रात दडून
नव्या क्षणांच्या उजेडाची
वाट पाहत

कदाचित हा प्रवास
असेल अनादि अनंत
अन असेल जुळत ,
विघटन होत ,जुळत
तीच तीच माती
खनिज प्रथिने मेद शर्करेचे
लोटावर लोट वाहत

पण ज्या आधारावर
अस्तित्वाचा हा ध्वजदंड
उभा आहे युगे न युगे
हे फडफडणारे मी पण घेऊन
तूर्त ती जमीन कुणाची आहे
एवढे कळले तरी पुरे आहे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...