दतात्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दतात्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

भक्ती

भक्ती
*****

दत्तात्रेया माझा त्याग करू नकोस कधीही 
सोवळे न माने मी राग धरू नकोस तरीही ॥

दत्ता तुझ्या त्या चार रेषा नाही मला पटत 
अन स्त्रीधर्म प्रकरण नाहीच दयाळा पचत ॥

सारे जग हे आहे ना तुझीच प्रभू काया 
निराकारा मग कुणी भेदले सांग रे वाया ॥

भेदभाव व्यर्थ आहे  जाती जातीत पडले 
आत्मतत्व चोखट ते रे कणाकणात भरले ॥

या हवे तर जन्माला दावा अन नवी कथा 
वठल्या झाडा तोडुनी नवा धर्म द्या जगता ॥

जळू देत सारी व्यर्थ कर्मकांड अडगळ 
शुद्ध धर्म विज्ञानाचा इथे नांदू दे केवळ ॥

जाणण्याचे  वेड जयाला तोच असे रे भक्त 
मिटो भेदाभेद सारे दिसो माणसात भगवंत ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

दिवाळीचे लेणे

दिवाळीचे लेणे
************
दत्त प्रकाशाचे गाणे 
सण दिवाळीचे लेणे
खुले आकाशात तेज 
हे तो अवसेचे देणे ॥

दीप प्रत्येक दारात 
आहे चैतन्य खेळत 
त्याचे आशिष थोरले 
घरा घरात तेवत ॥

दत्त रोषणाई दिव्य 
डोळे मिटता दिसते 
कणकणात फटाके 
कोण कळेना लावते ॥

रूप मनात धरले 
किती अंगानी नटले 
स्वामी गजानन साई 
दीप आवडी सजले ॥

किती अद्भुत सुंदर 
किती नटला अपार 
दत्त व्यापूनिया जग
प्रभा निघोट निश्चळ ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

खेळ

खेळ
*****
बांधुनिया डोळा जन धावे सैरा 
मायेचा पसारा कळेचिना ॥१
जरी असे कारा कळेना गबाळा 
सुखाचा सोहळा समजती ॥२
जरी पदी बेडी मिरवती वेडी 
साज त्या मानती आनंदाने ॥३
अवघा वेड्यांचा जमला बाजार 
चाले व्यवहार अर्थशून्य ॥४
आणि कोणी तया सांगावया जाती 
दगड हाणती माथ्यावर ॥५
चालला निरर्थ खेळ हा सतत 
पाहतो विक्रांत अचंबित. ॥६
कळेना का दत्त हसतो गालात
मायेच्या खेळात रमवून ॥ ७
अगा बरे नाही ऐसे हे खेळणे 
उगा फसवणे लाडक्यांना ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

गुरुवार, १ जून, २०२३

कृपेचा

कृपेचा 
******
राखला हा देह माझा दत्तात्रेये 
हरवली त्राये एक एक ॥१
अन्यथा असता कधीच सुटला 
फुगा हा फुटला कुण्या क्षणी ॥२
कितीदा आपदी  मज रक्षीयले 
मरणा धाडीले माघारी ते ॥३
कितीदा आणले पुन्हा घरी दारी 
सुटू वाटेवरी जाता जाता ॥४
भरण्या खळगी भुके दोन वेळा 
पोटार्थी  विद्येला  पाठविला ॥५
आणि वर बळे दिला मानपान 
कृपाळ सघन ओघळला ॥६
लायकी वाचून निशाण पै केले 
चिरगुट नेले आभाळाला ॥७
किती किती वाणू दत्ता तुझे ऋण 
तुज ओळगेन  जिवेभावे ॥८
विक्रांत भाग्याचा जाहला दत्ताचा 
आणिक कृपेचा घर केला ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १६ मार्च, २०२३

पाझर

पाझर
******

तुझ्यासाठी जरी 
लिहितो मी गाणी 
काय तुझ्या कानी 
पडती का ?   ॥

तुज आळवतो 
प्रार्थना करतो
हाकारे घालतो 
पुन:पुन्हा ॥

पाझर फुटेना 
कातळ तुटेना 
मज तू भेटेना
काही केल्या ॥

हळूहळू हाका 
होतात रे क्षीण
ज्योत मिणमिण
विझू पाहे ॥

विक्रांत न मागे 
तव प्रेमाविन 
दत्त दयाघन
अन्य काही  ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...