शनिवार, १ मार्च, २०१४

फुटपाथवरची मुलं ....



फुटपाथवर खेळणारी
अनवाणी पायांची
मळक्या कपड्यांची
आक्रमक मुलं...
काही कळल्यावाचून
असभ्य भाषेतून  
आईबहिणी वरून
शिव्या देणारी मुलं...
शिव्यांनीच संबोधन
शिव्यांचीच विशेषण
शिव्यांचीच अवतरण
मुखात पेरलेली मुलं...
गल्लीगल्लीतून उगाच   
उनाड धावणारी
गाड्यासमोर बिनधास्त
बेफिकीर पळणारी
निरंकुश सशक्त
तेज तर्रार मुलं....
सिनेमाच्या कथातून
घेत घेत प्रशिक्षण
गुंड रोड छाप हिरोला
आपला आदर्श मानून
थंड उद्धट मग्रूर
संवाद बोलणारी मुलं....
त्यांचे डोळे शाळेला कंटाळलेले
हात अवेळीच पैशाला चटावलेले
ती  स्वैर विमुक्त बेपर्वा
जीवनाचे व्यसन लागलेली मुलं....
त्यांना पहिले की
मला आठवतात ते
गावच्या माळावर
वेडेवाकडे आडवेतिडवे
वाढलेले प्रचंड तण.....
अवती भवतीच्या साऱ्या
लहान झुडूपांना खाली दाबून
वारेमाप धसमुसळेपणान
पसरलेले सैराट रान...
त्यांची तीष्ण काटेरी
धारधार पानं
अन तीव्र उग्र तिखट
ओल्या गंधानं
दरवळलेले माळरान ...
कुणाचीही पर्वा केल्यावाचून
उद्दंडपणे जीवनाकडून
उन वारा पाणी
घेणारे ओरबाडून  
राकट चिवट रानवट आणि बेपर्वा ..
जीवनाचे आदिम रसायन  
धमन्यातून खेळवणारी मुलं....
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...