दत्त वर्षा
*******
माझा आषाढ-श्रावण
म्हणे अवधूत गाणं
पानपान हरखते
तया नामात न्हाऊन ॥
नभी होते धडधड
शब्द गमे अवधूत
पाणी टपे टपे मंद
कानी पडे दत्त दत्त ॥
वारा इथे तिथे नाचे
मज स्मर्तृगामी भासे
ओघ कल्लोळ पाण्याचे
जणू झरे स्वानंदाचे ॥
होतो मेघ मी सावळा
उंच भिडे शिखराला
गिरनारच्या कुशीत
सोपवतो या देहाला ॥
बापा प्रेमळा श्रीदत्ता
नको विसरु विक्रांता
होतं तडित कृपाळ
नेई मनीची अहंता ॥
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा