मंगळवार, २३ जून, २०२०

पथिक

पथिक
******:

तुझिया पथीचा 
पथिक मी दत्ता 
चालतो परी का 
सरेना हा रस्ता ॥

वाट चुकली का 
दिशा हरवली 
कळेना मज का 
पडे रान भुली ॥

चालतो उन्हात 
तापाने पोळत
कधी अंधारात 
खडी ठेचाळत ॥

माझा उत्तरेचा 
प्रवास सदाचा 
मागतो प्रकाश 
तुझिया कृपेचा॥

येऊ देत वारा 
हिवाचा बोचरा 
फुटू देत टाचा 
छातीचा पिंजरा ॥

परी अंतरात 
पेटलेला दिवा 
नच देवराया 
कधी रे विझावा ॥

मिटताच डोळा  
दिसतो सामोरा 
नच हरवावा  
कधीच तो तारा ॥

विक्रांत ही वाट 
झाला वाटसरु 
विनवितो दत्ता 
चाल तयावरू ॥
****
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...