शनिवार, २५ जून, २०१६

फुलपाखरू....








आज असेच कुठेतरी  
फुलपाखरू शब्द हे दिसले
अन सहज आठवले
न जाणे किती दिवस गेले
मला या शहरात
फुलपाखरे दिसलीच नाहीत

मी लहानपणी पाहिलेली  
ओंजळीत अलगद धरून
पुन्हा सोडून दिलेली
पिवळी पिवळी इवली इवली
बोटांना गुदगुल्या करणारी
कधी पंखावर छोटा मोठा
गोलसा डोळा असलेली
हिरवी तांबडी सफेद निळी
कधी मोठाली अगदी काळी
अदभूत नक्षी कोरलेली
तरीही नाजूक रेशीम
देह मखमली ल्यालेली ..

आता या शहरात दिसत आहेत
जमीनी गिळणारे बिल्डर
वृक्ष पाडणारे सरकारी नोकर
क्रिडांगणे आणि उद्याने
हडपणारे राजकारणी
आकाश गिळणारे धनी
लोंढा भरभरून येणारी
रस्ते किनारे खाड्या बुजावणारी
अगतिक माणसांची रहदारी
हवेपणाच्या आकांक्षेचा
राक्षस झालेली  
बुभुक्षित खानेसुमारी

इथे फुलपाखरांनी काय करावे
बसायला फुल नाही
नाचायला पान  नाही
पिलांना जागा नाही
कोशास आडोसा नाही
जणू या शहरास मुळी
फुलपाखरांची पर्वाच नाही

शहर मग्न आहे
पैशाच्या खणखणाटात  
गाड्यांच्या धडधडाडात
प्रकाशाच्या चकाकात
असंख्य सुंदर क्षणांचे
नाजूक फडफडते तुकडे 
कायमचे हरवून  
यांत्रिकता पांघरून
 
अन आजकाल तर मला
कुणाच्याही मनात
फुलपाखरे दिसत नाही
ती रंगबिरंगी भिरभिरती
क्षण झुळूकात नर्तन करती
रंग बदलती विभ्रम करती
स्मृती गंधात हरवून गेली
स्वप्न बावरी छान छकुली

जीवन जणू की झाले आहे 
मठ्ठपणात अर्थ हरवले
तारीख बदलत पुढे जाणारे
फुगणाऱ्या पगार आकड्यास
सारे सार्थक मानणारे
मूढ सुखाच्या आभासात
खरेखुरे सौख्य गमावले  

अन फुलपाखरू वाटू लागले
प्रतिक एक सजलेले
जीवनाच्या संवेदनशीलतेचे
जागेपणाचे सार्थकतेचे
भान आपल्या असलेपणाचे !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...