रविवार, ५ जून, २०१६

नर्मदामैयेच्या काठावरून





                

हजारो नग्न देहातून वाहत असते भूक
आतड्यांचा कोळसा करणारी  
तरीही येताच अतिथी झोपडीच्या दारी
एकाची अर्धी होते भाकरी
खपाटीला गेलेले पोट
आणि बसलेली गालफड
यातून आजही उमटते निर्व्याज हसू
खळखळत्या शुद्ध झऱ्यागत 

चिंध्या गुंडाळलेली
मोळी विकणारी
ती कृश म्हातारी
टेकवते माथा देवापुढे कृतज्ञतेने
अन देते धन्यवाद होत कापरी
मिळालेल्या एक वेळच्या अन्नासाठी
तेव्हा शांतीचे अपूर्व तेज
झळकत असते तिच्या चेहऱ्यावरून
मग काळही थांबतो तिच्यासाठी
त्या क्षणाचे लेणे देही पांघरून घेण्यासाठी

नावही माहित नसलेल्या
कधीही न पाहिलेल्या
त्या इवलाल्या गावातून
एकटे चालणाऱ्या
त्या अनाम पांथस्थासाठी 
पुराण नदी किनारी
अनाम श्रेय शोधणाऱ्या
त्या भणंग मस्त पीरासाठी  
सारे विश्व घर होते
प्रेम जिव्हाळा असलेले
दिसते बांधलेले
श्रद्धेच्या एका विलक्षण धाग्याने

जीवनावर उमललेल्या हजारो अभिलाषा
अन खोलवर घुसलेले असंख्य अभिशाप 
मिरवणारे हे जनमानस
उभे आहे त्या निगूढ शक्तीशी नाळ बांधून  
पिढ्यानपिढ्या अतीव विश्वासाने
तुलसीरामायण गीता भागवत
गाथा ज्ञानेश्वरी उरी कवटाळून
गोरख दत्त कबीर मीरा
जीवन साथी मानून  
शिव नर्मदा विष्णू गणेश
पुराण माथ्यावर धरून
जगण्याचा अन अस्तित्वाचा अर्थ जाणण्याची
उत्कट इच्छा मनात एकवटून 
त्या विश्वात्मक शक्तीला सर्वस्व मानून
अन जगतात कळत न कळत
स्वत:च देवतुल्य होवून

चारी बाजूनी घोंगावत येणाऱ्या
संपन्नतेने वखवखलेल्या
भोगवादी स्वार्थपरायण आत्मकेंद्री जीवनशैलीचा
घातक संसर्ग होवूनही
एक अस्पर्श निरामय अवधूत अस्तित्व
खोलवर वसले आहे इथल्या कणकणात
अस्तित्वाचा अविभाज्य भाग होवून
मी खरच भाग्यवान आहे
इथला जीवनकण आहे म्हणून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...