शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

चांदरात







आठवतो मला
विजेचा स्पर्श न झालेला माझा गाव
अन सारे गाव कुशीत घेवून
बसलेले ते अद्भूत चांदणे .
मातीच्या घरावर
ठेंगण्या झोपड्यावर
बाभळीच्या झाडावर
पांढऱ्या गोल देवळाच्या घुमुटावर
पसरलेले ते सृष्टीचे लावण्य.
गडद गूढ विस्तीर्ण आकाशातील
सदानकदा जाणवणारे
सार्वभौम सम्राटा सारखे
झगझगते चंद्राचे अस्तित्व
अन मग देवीच्या दीपमाळेवर पेटलेला
तो लाल पिवळा अग्नीशलाकांचा  
धगधगता कुंड
जाणवायचा त्यात आदिमायेचा
आश्वासक प्रेमळ
एक धीर देणारा स्पर्श ..
कितीवेळ मग अंगणात
निजेने डोळे मिटेपर्यंत
पाहायचो मी तो
चंद्र अन मेघांचा खेळ
थंडगार गोधडीवर निजून
मन विरघळायचे त्या किरणात
एक सुखाचा आनंदाचा कण होवून
अन मिटायचे डोळे
पण तृप्तीने की अतृप्तीने
कुणास ठावूक

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...