नाव विसरत आहे मी
चेहरे विसरत आहे आता
एकेक फुल विस्मृतीत
गळून पडत आहे आता
इतका दूरवर आलो मी
प्रवाहात वाहत असा की
मागची कित्येक दृश्य
धुरकट दिसत आहे आता
पुढे काय मांडले तेही
पाहायचे नाही आता
स्मरणाचे विद्ध पक्षी
फडफडत आहे आता
आशा उमेद उत्साहाचे
ते जगणे स्वप्न होते
का सत्य हे पहाया मन
दचकत आहे आता
कित्येक पेशी उध्वस्त
स्मृतीकुंभ भरलेल्या
तळघरातील अंधारात
क्षीण कन्हत आहे आता
रूप गंध स्पर्श सारेच
भास वाटतात इथले
अन या क्षणीचा मी
मला शोधत आहे आता
अन पुनर्नुभवी
वासनांची
सारीच अट्टाहासी भुते
कोपऱ्यातच मनाच्या
वितळू पाहत आहे आता
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा