शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

खुळी तुझी स्वप्न



खुळी तुझी स्वप्न
जातात उडून
हाती आल्याविन
काळ ओघी ॥
कधी आकाशाचे
कधी या मातीचे
परंतु अभ्रांचे
सारे गाव ॥
अडके आकडा
जसा काळजात
दुःखाचा संघात
तैसा सवे ॥
कोण तो दयाळू
मांडे असा डाव
शोधूनिया ठाव
लागेचिना ॥
जीवा फरपट
सुख संपत्तीत
दुःखाचे गणित
कळेचिना  ॥
सरो व्यवहार
जपणे ठेवणे
आयुष्याचे देणे
पुरे झाले ॥
सरो साचलेले
गाठी मारलेले
तुवा कोंबलेले
दिगंबरा ॥
विक्रांत याचक
फुटक्या भांड्याचा
वाहे जगण्याचा
भार उगा॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...