मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

बाबासाहेब आंबेडकर नावाची कविता



बाबासाहेब आंबेडकर नावाची कविता

इतिहासाच्या पानावर
लिहिल्या गेल्या आहेत
असंख्य कविता .
करुणेने ओथंबलेल्या
गायले गेले आहेत
असंख्य पोवाडे
शौर्याने फुरफुरणारे
अगणित युद्ध गीते
क्रौर्याने भिजलेली
रक्तात साकळलेली
आणि किती एक
ती कारुण्य गीते
हृदय पिळवटून टाकणारी
बलिदानाने हळहळणारी

पण तुझी कविता
सगळ्यात वेगळी आहे
तुझी कविता तुझ्या
जगण्यातून उमटली आहे
तुझी कविता माणुसकीच्या
पुनर्उत्थानाचे गीत आहे
त्याच्या शब्दा शब्दात आहे
गिळलेल्या अपमानाचा अंगार
त्याच्या मुळाशी आहेत
पिढ्यान पिढी दडपलेले हुंकार
तुझ्या कवितेने सांगितले जगाला
माणूस कशाला म्हणतात
जगणे काय असते
आणि जगण्यापेक्षा श्रेष्ठ
काहीही नसते
तुझी कविता जीवनाचे गाणे आहे
म्हणूनच
तुझी कविता गातो आहे मी
तुझी कविता जगतो आहे मी
जन्माने कोणीही मोठा नसतो
आपणच आपल्या जीवनाचे
सूत्रधार असतो शिल्पकार ठरतो
याचे आत्मभान आणून देणारी
लाचारी नाकारून
आत्मग्लानीच्या दलदलीतून
बाहेर काढणारी तुझी कविता
ही मी वाचलेली
एक सर्वश्रेष्ठ कविता आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...