राधा कृष्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राधा कृष्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

प्राणप्रिय

प्राणप्रिय
*******
आज माझ्या ओठावरी 
तुझे गाणे नाही जरी 
काळजात पिळ खोल 
वेदनांचे गाव उरी ॥१

बोलावून प्राणप्रिय 
येणे तव झाले नाही 
असूनही ध्यास तुझा 
रूप दिसलेच नाही ॥२

जपुनिया जीवापाड 
निसटले काहीतरी
ठाव तुझे घर जरी
हरवलो रहदारी ॥३

रोज रोज स्वप्न तुझी 
भूल होती जीवावरी 
जाणूनही अप्राप्य तू
डोळे तुझ्या येण्यावरी ॥४

फार फार कधीतरी 
होते दवबिंदू करी 
ओघळले कुण्या क्षणी
येता येता ओठावरी ॥५

मोहजाल त्या कणांचे 
व्यापुनिया मनावरी
अधीर हे जिणे माझे 
सरो तुझ्या दारावरी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

स्मृति

स्मृती
***
तुझ्या स्मृतीचे तुषार 
खिळलेल्या मनावर
कोरड्या ऋतूत साऱ्या 
हिरवळ देहावर ॥१
आकाशाचे वैर जरी 
वाहते प्रारब्ध शिरी 
मोजून सुख एकेक
ठेवले भरुनी उरी ॥२
जरी अट्टाहास नाही 
पुन्हा चिंब भिजायचा 
भरुनिया घेतला मी 
स्पर्श तुझ्या असण्याचा ॥३
अस्तित्वा ठाऊक नाही 
मुळे किती खोलवर 
त्याही पलीकडे कुठे 
जीव धावे अनावर ॥४
नसणेही तुझे होते 
असणे हे माझ्यासाठी 
पानोपानी चित्र तुझे 
दिठिविना देखे दिठी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास

१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास ************************** हे माझ्या सुंदर देशा  तुझ्यासाठी मी फारसे काही करू शकलो नाही.  घरदार संस...