गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

निरोप



निरोप
*****
भाऊ निघाला समरी
दही देते हातावरी
आई सांभाळ भावड्या
आण सुखरूप घरी

भाऊ शिवबाचा भक्त
त्यांच्या रक्तात तान्हाजी
खिंड राखेल शर्थीने
जणू दुसरा की बाजी

सीमा पेटली पेटली
विष दंतानी वेढली
नाच फड्यावर असा
कृष्ण होवून मुरारी

नको येऊन देऊस
आच एका घरावरी
भूमी इंच इंच लढ
कुळनाव सार्थ करी

वैनी लाडकी लहान
हात पिवळे अजून
नको पाहूस वळून
तिला डोळ्यात ठेवीन

येशी परतून जेव्हा 
गावी पिटेल दवंडी
जगी मिरवेल द्वाही
आला शिवबाचा गडी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन् काय मती  तुज दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा देहा...