शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

संचिताचा खेळ खुळा





संचिताचा खेळ खुळा
तुझ्या माझ्या नात्यातला
मांडीयला त्या कळेना
अंत काय द्यावा याला

द्यावी फरफट उगा
की अर्थ काही सजला
साकळले व्रण किंवा  
हात हळू फिरणारा

मागण्या वाचून आले
दान हाती जे या करी
स्वागताला सज्ज सदा
झेलून त्या घेतो उरी

सुख दु:ख भरलेले
जीवनाचे वाहे पाणी
भेट होता तुझी गेलो   
सांज रंगात रंगुनी

तेच क्षण मागतो रे
मी तया पुन्हा पुन्हा
वाहण्याचा धर्म दे रे
जीवनात जगतांना

लेख लिहलेले भाळी
सटवीचे असो काही
पाहतो मी तुला असे  
भाग्य हे ही कमी नाही

म्हणती प्रारब्ध कुणी
जाणे इथेच भोगूनी
म्हणतो मी भाग्य त्यास
घेतो आणि आलिंगूनी


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...