न्याय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
न्याय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

वेडे

वेडे
*****
त्या वेड्यांनी उगा वेचले 
आयुष्य देशासाठी आपले
चूड लावूनी घरदाराला 
उगाच फासावरती चढले ॥१

बलिदानाची  गोड फळे ती
खात आहेत भुजंग विषारी
 रक्तावरही जे घेती टक्के
होऊन बनेल सत्ताधारी ॥२

उगाच करती आवाज मोठा 
गोळा करूनी चिल्ली पिल्ली 
बिनकामाचे सैन्य जमवती
मने पेटली द्वेष आंधळी ॥३

प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा 
पैसा देव ज्याला त्याला 
लुटा प्रजेला लुटा देशाला 
इकडेतिकडे खुशाल उधळा ॥४

आम्ही आपले बिळात लपतो
जगतो केवळ उगाच जगतो 
घाणीच्या या डम्पिंग मध्ये 
कपडे फक्त आपले जपतो ॥५

आणि काही उरात कढले 
अश्रू डोळ्यामधील पुसतो 
खंत खरी असते तरीही 
हळहळीतच आपुल्या मरतो ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २२ जुलै, २०२५

न्याय

न्याय
******
तीच न्याय संस्था फाशी सुनावते 
तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते 
व्यक्ती तीच असते 
आरोपही तेच असतात 
सुनावनी तशीच होते
पेपरही तेच वाचले जातात 
तरी थोडेफार बदलूही शकते 
असे सामान्य लोकांना वाटते
पण काळ्याचे पूर्ण पांढरे  झाले की 
मन हवालदिलं होते

म्हणजे निव्वळ संस्था अन् कायदा
सारे काही ठरवत नसतात 
आधीचा न्याय खरा 
का नंतरचा न्याय खरा 
सारेच निकाल गोंधळात पाडतात 
सामान्यांना काय कळते 

तेच कायदे तीच कलमे 
तीच काथ्याकुट तीच चर्चा 
तेच बुद्धिवान प्रगल्भ न्यायाधीश 
तर मग नेमके पाणी कुठे मुरते
सामान्य लोकांचे डोके चक्रावते 

मग न्याय ठरवणारे 
ते अनाकलिन तत्व 
नेमके काय असते ?

किंवा जरी न्यायबुद्धी 
प्रत्येकाची वेगळी असते 
जी पेपराच्या अन् दबावाच्या 
पलीकडली असते
तिची सामान्यजना तर धास्तीच वाटते

खरतर कुठेतरी वाचले होते
न्याय तर दिला गेलाच पाहिजे
एवढेच नव्हे 
तर न्याय दिला गेला हे 
दिसायलाही हवे असते 
अन् तसे होत नसेल तर  
सामान्यांना सगळेच खोटे वाटते

कोण चुकले कुठे चुकले 
तपासात वा काही राहिले
निरपराधी उगा भरडले गेले 
खरे अपराधी पळून गेले 
प्रश्न प्रचंड उभे राहतात 
सामान्यांचे डोके भणाणते

पण ज्याच्या घरातील माणूस मेले 
कर्ते सवरते खांब पडले 
न्यायाच्या प्रतीक्षेत 
ज्यांनी वर्षानुवर्षे काढले 
त्यांच्या पदरात न्याय पडावा
तो झालेला दिसावा
सामान्यांना एवढीच अपेक्षा असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 




स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...