फांदिफांदीवर फुटलाय धुमारा
हे झाड बहरून आलय आता
देही उसळला ऋतूचा सोहळा
सारे वाटत सुटलय ते आता
फुलणे हा झाडाचा धर्म असतो
आणि फळणे हीच कृतकृत्यता
ते भाग्य तया भेटलेय आता
त्याला सुखे हिंदोळू द्या आता
तसे फार काही नाही त्याच्याकडे
गंधाने व्यापलेले मुठभर आकाश
आणि रंगांत विखुरलेले हे इवलाले
तुमच्या आमच्या सुखदु:खाचे भास
त्या गंधाला मोल असेल वा नसेलही
त्या फुलांनी घर सजेल न सजेलही
पण असे बहरता येते कणाकणातून
कळेल या जगाला हे ही कमी नाही
सर्वांगाने फुलणे म्हणजे गाणे असते
मी माझ्या गाण्यात बहरलोय आता
घेणे न घेणे तुमच्या हातात असले तरी
न देणे माझ्या हातात उरले नाही आता
डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा