आर्तीचे व्याकुळ
तुवा सांभाळले
देहासी रक्षिले
कौतुकाने ।।
प्रेमासी विकला
रंग रूपा आला
योग क्षेमी झाला
मायबाप ।।
पोटा दिले अन्न
निवाऱ्यास छत
झाला सदोदित
पाठीराखा ।।
जाणतो मी दत्ता
माथी तुझा हात
संकटात साथ
अहर्निशी ।।
आता फक्त कर
एकची ती कृपा
कोंदाटल्या रूपा
दावी मज ।।
सदा राहो तुझी
मज आठवण
स्वरूप स्फुरण
क्षणो क्षणी ।।
विक्रांत आर्त ना
जिज्ञासू फारसा
प्रेमाची पिपासा
परी आत ।।
डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा