शनिवार, १३ मे, २०१७

ती गजरा !!


गजरा !!

काळी बुटकी
बसक्या नाकाची
बारीक डोळ्याची
बरचशी
कुरूप दिसणारी
गजरा !
होती माझ्या वर्गात 
सातवी आठवीला ..

गुपचूप यायची
क्वचित हसायची
परीक्षेत हमखास
नापास व्हायची
तशी ती नव्हती
खिजगनितीत माझ्या
लक्ष देण्यासारखे
काहीच नव्हते तिच्यात

पण एक दिवस
पंचमीच्या बारीत
पाहिलं मी तिला
रंगवून चेहरा
घालून दागिने
गर्दी समोर
स्वैर नाचतांना
कुठलतरी
पांचट गाणं
देही मिरवतांना
तिचं तोंड भरून हसणं
लोकांचं शिट्या वाजवणं
अन ते पैसे उधळण ..
पाहिलं अविश्वासानं

तसा त्या गावाचा
रिवाजच होता
दरसाल पंचमीला
नायकिणीचा नाच
फुकट दाखवायचा
आणि कुतूहलाने गेलेलो मी
झालो प्रचंड शरमिंदा
ते सारे पाहतांना
तसे गजराला नाचतांना
ते पैसे गोळा करतांना

तिने पहिले नसावे
मला कदाचित
मी मागच्या मागे
पाय काढला
मान खाली घालून
त्या गर्दीत

नंतर दोन तीन दिवस
माझा धीर झाला नाही
गजराकडे पाहण्याचा
पण ती तशीच होती
शांत संथ काहीशी मख्ख
यायची शाळेच्या युनिफोर्म मध्ये
तोच पायघोळ निळा परकर  
आणि पांढरा सदरा घालून
बसायची वर्गात
पेंगुळल्या डोळयांनी
ऐकायची शिकवणं
कळल्या न कळल्या चेहऱ्यानी

ती दिसली की
मन भरून जायचं
एका अनाम दु:खानं
एका वेगळ्या कौतुकानं
आणि व्यथित करुणेनं

पण ती येताच समोर
मी पळ काढायचो
मागच्या मागं
काहीतरी बहाणा करून
कदाचित
त्या गर्दीतील माझी ओळख
तिला पटू नये म्हणून

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाजार

दत्ता . **** कसे आळवू तुला मी या संसार कबाड्यात  कसे शोधू तुला मी या रोजच्या बाजारात । इथले हिशोब तेच जुनाट  चालतात दिनरात तीच ब...