एक जगण्याचे नाटक
जीवनाच्या वाटेवर
चाल चालतांना
दिवसांची वाळू
हातून निसटतांना
तिला उमजले हळू
हळू
अरे आपण चालतोय खरं
पण ही वाट आपली नाही
आणि त्या वाटेवर
चालणारा ही !
हे उमजताच
खरतर ती थोडी
घाबरली
थोडी गडबडली
अन सारे यत्न
पणाला लावले तिने
त्या वाटेवरच मन
गुतवायला
नव्या आडव्या
आलेल्या वाटेतून मन काढायला
पण शक्य होईना
मग तिने सोबत्याच्या
हात घट्ट ठरला
अन घेवून जावू
लागली त्याला
त्या नवीन
मार्गावर
जिथे होती तिची
पाखरे
तिची फुले अन
तिच्या वेली
तिचीच गाणी
गाणारी झाडे
आणि त्यांची
गंधित सावली
पण तो मुळी बधलाच
नाही
त्याच्यासाठी हीच
वाट होती
आणि ती अगदी
सुयोग्य होती
कदाचित
सामाजिक संस्कार
किंवा पुरुषी
अहंकार
काहीतरी आड येत
होते
कादाचित ते दोन
जगातले अंतर होते
अन ती जावू लागली
फरफटत त्याच्या
मागे
हळू हळू शब्दांचा
दुरावा आला
मग स्पर्श ही परका
झाला
शिशिरात
झाडणाऱ्या पानागत
भावना ही गळून
पडल्या
त्या बधीर
गोठणाऱ्या दुराव्यात
रात्री
वर्षांच्या झाल्या
अन एकांताच्या
भिंती गेल्या
गगनापर्यंत
न जोडण्यासाठी
अहंकाराचा आक्रोश
झाला
अस्तित्वाच्या
दरीत
व्यक्तीत्वाच्या ठिकऱ्या
उडवीत
आणि जोडलेले नाते
गेले
फाटत चिंध्या होत
काटेरी तारेत
अडकलेल्या
विरळ कापडागत
एक दिवस तिने
त्याला
सांगून टाकले न
राहवून
बिनदिक्क्तपणे
तू माझा जिवलग
नाहीस
माझा सोलमेट कुणी
वेगळाच आहे
खचलेल्या घराला
ते धक्का देणे होते
एक धुळीचा लोट
उठला
आणि पुन्हा खाली बसला
तेव्हा जग बदललेले
होते
पण आता नवीन घर
बांधणे
दोघांनाही शक्य
नव्हते
मग त्या
तुटलेल्या ढिगाऱ्यावरील
पसारा दूर करीत
उघड्यावरच अदृश्य
भिंती बंधित
ते जगत राहिले
धर्मशाळेत
भेटलेल्या वाटसरूगत
एकमेकांची ओळख न
वाढवत
तरीही साखर चहा
काडेपेटी
यांची देवाण
घेवाण करत
अपरिहार्यतेने
ती होती तिच्या
खुणावणाऱ्या
वाटेला पुन्हा
साद घालत
आणि तो त्याच्या
अहंकार कुरवाळत
आणि एक जगण्याचे
नाटक होते घडत
डॉ. विक्रांत प्रभाकर
तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा