गुरुवार, ४ मे, २०१७

वाटले थोडे




थवे इथे उजेडाचे असावे वाटले थोडे 
क्षण काही प्रकाशाचे जगावे वाटले थोडे ।।

भोवती अंधार दाट वाट हरवून गेली 
उजेडात चांदण्याच्या चालावे वाटले थोडे।।

तसे तर नाते इथे कधी घटलेच नाही 
घेऊन हातात हात बोलावे वाटले थोडे ।।

भेटलीस युगे जाता दोन तीरावरी जन्म
होडी घेऊनी कुठली तरावे वाटले थोडे ।।

मातीतले जीणे माझे मातीत या मरणे
तृण होऊनी इथला हसावे वाटले थोडे ।।

हरलो हजार वेळा फासे उलटेच सदा 
तरीही शतदा इथे खेळावे वाटले थोडे ।।

बेवफा पाहुनी जग दाटलेले दुःख जरी 
जुलमी डोळ्यात कुण्या डुबावे वाटले थोडे ।।

ज्ञानदेवा हाक माझी अजुनी भरीव नाही
आळंदीत मग तुझ्या  मरावे वाटले थोडे ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दुर्लभ

दुर्लभ ***** तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ  मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१ ज्याची कुळवाडी असे देवभक्ती  सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२ ज...