मनन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

गणित

गणित
*****

गणित या जगताचे
नाही कुणास सुटत 
सारे आकडे अस्थिर
नाही कुणास कळत

जगी कुणी फुशारतो
पुण्य राही मिरवत 
दिसे तो ही सापडला 
पापाच्या रे तावडीत

दिसे केले पाप ज्यांनी
ते ही सुखी जगतात 
मग पाप काय असे
सारे  घोर गोंधळात

इथे सदैव दिसते
पापपुण्याची मिसळ
पुण्य होते व्यर्थ सारे
आणिक पाप उजळ 

पाप पुण्य ठरवले 
नीती नियमी कोंडले 
पाप लागते कुणाला 
काय कोणी रे पाहिले

सत्य अहिंसा आचार 
कुणी मारतात रेषा 
परद्रव्य निंदा दारा 
कुणा कठीण परीक्षा 

धर्म कर्मात कुणाच्या 
लाखो गरीब ते मेले
हाती घेऊन ते झेंडे 
देश लुटत राहिले 

दान देऊन गरीबी 
कुणी पोसत राहिले 
अन्नछत्र सदावर्त 
कुठे लंगर चालले 

आगा गरीबा वाचून
पुण्य घटणार कसे 
दान उपकार सेवा 
धर्म बाटणार कसे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .





बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

तेच तेच मागणे

तेच तेच मागणे
***********
तेच तेच मागणे रे पुन्हा त्याच देवालयी
अरे कशा जात नाही या भिकारड्या सवयी 

धन देई यश देई गाई गुरे बळ देही 
मागण्यात भय थोर नसे भरवसा काही

देतो देव घेतो काय तेही नीट ठाव नाही 
सजलेल्या दुकानात भक्त गिऱ्हाईक होई

धनामना पलीकडे दिव्यत्वाचा शोध काही 
मान्य जीवा असतेच अतृप्ततेची जाण ही 

तीच ती रे प्रार्थना तीच असे आराधना 
धरूनिया तिला सवे जगावे रे या जीवना 

बाकी सारा व्यवहार भय व्यथा कारभार 
पांघरुनी भक्ती कंथा मन शोधते आधार 

बदलती देश तसे देव ही बदलतात 
आधार भय चिंतेचे तसेच ते राहतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

जाणे

जाणे
*****
तुझे आकाशाचे नाते 
तुज कळत का नाही 
तुझे धरित्रीचे मूळ 
तुज दिसत का नाही ॥

नादी लागून वाऱ्याच्या 
भरकटतो सारखा 
जग घालून जन्माला 
का रे त्यात तू परका ॥

लाख सवंगडी तरी 
जन्म विराण एकटा 
हात सोडवून दूर 
नेती प्रवाहाच्या वाटा ॥

जन्मा आधीचा एकांत 
गुज सांगतो कानात 
झाले खेळणे बहुत 
येणे परत घरात ॥

रंग अवधूत तोच
वाट पाहतो शून्यात 
गजबजाट जगाचा 
आता हरपो वाऱ्यात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


पुन्हा पाऊस

पुन्हा पाऊस ********** रात्रंदिन पडणाऱ्या धारात  आभाळ येते  दाटून घुमसून अन सांजवेळ जाते निसटून  पडद्यामधली पडद्यामागून  रंग कुठ...