गर्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गर्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुख

सुख 
****
हजारो भक्तांच्या लांबवर रांगा 
भावभक्ती दंगा अनावर ॥१

ज्याला त्याला होते जायचे रे पुढे
दामटती घोडे आपुले ते ॥२

आस दर्शनाची जरी की डोळ्यात 
लक्ष घड्याळात जाते तरी ॥३

परतीची गाडी हवी धरायला 
जाणे मुक्कामाला ठरलेल्या ॥४

थोडी घुसाघुस थोडी रेटारेटी 
आणि दमदाटी मान्य मनी ॥५

देवाचिये द्वारी ओळ ओठावरी 
भाव तो जिव्हारी धरूनिया ॥६

क्षण दर्शनाने विसावतो जीव 
धन्यतेचा भाव मुखावर ॥७

विक्रांता तयाचे वाटते कौतुक 
देवा देई सुख  मज तैसे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २७ जुलै, २०२५

चाकरमानी

चाकरमानी
********
पोटाला पाठीला 
पिशव्या बांधुनी
कामाला निघती
हे चाकरमानी ॥

चाकरमान्याच्या 
डोळ्यात घड्याळ
देहा चिकटली 
लोकलची वेळ ॥

चाकरमान्याचे 
दिवस सातच 
वर्षाचा हिशोब 
नसतो कुठेच ॥

उजाडे दिवस 
मावळे दिवस
कळल्या वाचून 
सरतो दिवस ॥

बाकीच्या कामात
सरे रविवार
सरता सरता 
येई सोमवार ॥

परत पिशव्या 
डबे ते तयात 
पायाची भिंगरी 
धावते फलाट ॥

अन् कधीतरी 
थांब सांगे वय 
काय करू आता 
तया वाटे भय ॥

धावलो आपण 
जगलो आपण 
आयुष्य गर्दीत 
हरवले पण . ॥

चालले हे यंत्र 
थांबले हे यंत्र 
कळल्या वाचून
जगण्याचे तंत्र ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २० जुलै, २०२५

गर्दी व एकाकीपण


गर्दी व एकाकीपण
**************
सोडुनिया घर येता पथावर 
फलाटांची गर्दी घेता अंगावर 
भयान एकाकी असतो आपण 
अस्तित्वाचा होत नगण्यसा कण 

पदवी नसते प्रॉपर्टी नसते 
असण्याची काही नशाही नसते 
आपण गर्दीला नसतो बघत 
गर्दी आपल्याला नसते बघत 

एक धडपड कुठेतरी आत 
एकटेपणाला राहते टाळत 
असून मोबाईल सतत हातात 
एकटेपण ते राहे रेंगाळत 

ओळखी वाचून कुणाशी बोलत 
आपण राहतो तयाला टाळत 
स्मृतीच्या भिंतीत स्वतःला कोंडत 
स्वप्नांचे इमले उंच वा रचत 

तरी कासावीस खोलवर आत 
सुरक्षा कवच असते तुटत
तेच भय मग आदीम जुनाट
राहते आपले अस्तित्व व्यापत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन्  काय मती  तुझं दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा दे...