चाकरमानी
********
पोटाला पाठीला पिशव्या बांधुनी
कामाला निघती
हे चाकरमानी ॥
चाकरमान्याच्या
डोळ्यात घड्याळ
देहा चिकटली
लोकलची वेळ ॥
चाकरमान्याचे
दिवस सातच
वर्षाचा हिशोब
नसतो कुठेच ॥
उजाडे दिवस
मावळे दिवस
कळल्या वाचून
सरतो दिवस ॥
बाकीच्या कामात
सरे रविवार
सरता सरता
येई सोमवार ॥
परत पिशव्या
डबे ते तयात
पायाची भिंगरी
धावते फलाट ॥
अन् कधीतरी
थांब सांगे वय
काय करू आता
तया वाटे भय ॥
धावलो आपण
जगलो आपण
आयुष्य गर्दीत
हरवले पण . ॥
चालले हे यंत्र
थांबले हे यंत्र
कळल्या वाचून
जगण्याचे तंत्र ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️