दर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुख

सुख 
****
हजारो भक्तांच्या लांबवर रांगा 
भावभक्ती दंगा अनावर ॥१

ज्याला त्याला होते जायचे रे पुढे
दामटती घोडे आपुले ते ॥२

आस दर्शनाची जरी की डोळ्यात 
लक्ष घड्याळात जाते तरी ॥३

परतीची गाडी हवी धरायला 
जाणे मुक्कामाला ठरलेल्या ॥४

थोडी घुसाघुस थोडी रेटारेटी 
आणि दमदाटी मान्य मनी ॥५

देवाचिये द्वारी ओळ ओठावरी 
भाव तो जिव्हारी धरूनिया ॥६

क्षण दर्शनाने विसावतो जीव 
धन्यतेचा भाव मुखावर ॥७

विक्रांता तयाचे वाटते कौतुक 
देवा देई सुख  मज तैसे ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २१ जुलै, २०२५

पाहिली पंढरी


पाहिली पंढरी
***********
पाहिले सुंदर रूप विठोबाचे 
दिठी अमृताचे पान केले ॥१

पाहिली पंढरी भक्त मांदियाळी 
जीवाला भेटली जिवलग ॥२

रम्य चंद्रभागा पाहिली मी अगा 
हृदय तरंगा उधाण ये ॥३

पायरी नाम्याची स्मृती चोखोबाची 
मूर्त पुंडलिकाची पाहियली ॥४

पाहिला अपार भावाचा सागर 
जल कणभर झालो तिथे ॥५

काय सांगू मात तया दर्शनाची 
तृप्ती या मनाची नच होई ॥६

आगा विठुराया वाटे तुझ्या पाया 
विक्रांत ही काया सरो जावी ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...