नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

झाड तोडणारा X लावणारा

झाड तोडणारा X लावणारा
*********************

कुणी झाडे लावण्यास ..
करतो आटापिटा .
कोणी झाडे तोडण्यास
करतो आटापिटा 

जरी एकाच वास्तूचे 
असतात खांब ते
एक हाले गदगदा 
एक खोलवर रूते 

सावरत्या खांबा पण
 बळ मजल्याचे नाही 
हालणारा खांब अन
 फौज आणतसे भारी

लाऊनिया झाडे इथे 
पदरात काय पडे 
रिते होऊनीया खिसे 
वर हेलपाटे पडे 

तोडूनिया झाड पण
खिसे होती खुळखुळे 
मिळतात निमित्त ते
रेटतात  बळेबळे 

वरच्याचे हिशोब ही
वेगळेच काहीतरी
भलावण शब्दी अन
धूर्तपणा दूरवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद
*********
जळताच झाड मन विद्ध होते 
तोडताच झाड मन कळवळते 
एकेक झाडात लक्षावधी जीव 
राहतात प्रेमाने करुनिया गाव 
किती ते कीटक आणि पक्षीगण
घरटे कुणाचे रे विश्रांतीचे क्षण 
जीवन रसाचे गीत मंद मौन
खोडात वाहते एक संजीवन
कुणाशी ना वैर आप पर भाव 
खोलवर ओल दाता त्याचे नाव 
का रे बाबा वैर करशी तयाशी 
नको रे होऊस उगा पाप राशी 
खांडववन शापे पार्थ वंश गेला 
सवे यादवाचा सर्व नाश झाला 
इतका समोर आहे रे इतिहास 
जागा होई मित्रा पालट दिवस

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

झाडे मरतात .

 

 
झाडे मरतात 
**********
असे कसे हे 
रे असे कसे
जिकडे तिकडे 
भरतात खिसे .
 
तोडता भरती खिसे 
लावता भरती खिसे 
खिशात पैशाचे 
जणू की झाड असे .
 
काल होता तो 
गुटगुटीत कर 
आज आला तो 
नवा टी शर्ट कर .
 
नाव रूप वेगळे 
तंत्र यंत्र आगळे 
तेच परी ते रे
कर्तृत्व असे काळे .
 
कधी हातात हात 
कधी फुल हातात
असो कुणीही पण
बिचारी झाडे मरतात .
 
झाडास नाही पक्ष
झाडास  नाही रक्षक
हिरवे मांस जणू  ते
सारेच इथे भक्षक.
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, ४ डिसेंबर, २०२५

नाशिक वृक्ष तोडी निमित्त


वृक्ष तोडी निमित्त 
**************
महाजन येन गतः स पंथाः
नको जावूस तू रे कधी वृथा

असे म्हणण्याची वेळ आलीय 
देवा, आत्म परीक्षेची वेळ आलीय 

इरेला पेटलेला राजकारणी 
करतो सदैव स्व पक्षाची हानी 

झाडे तोडू जाता आरेत अरेरावीने
शाप भोगले ते आठवा आठवणीने 

पुन्हा तसाच गुन्हा करू नको मित्रा 
झाडाहून साधू मोठा नसतो मित्रा 
 
झाडा सारखा साधू नसतोच दुसरा 
हिशोब वृक्षवधात दिसतोय मला दुसरा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...