गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली 
***********
महाड मधील आमचे घरमालक कोकणे,
भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले,
विजय दिलीप अशोक प्रदीप आणि राजू 
पाच मुले काय पाच रत्नच होती .
प्रत्येक जण , स्वयंभू 
दुसऱ्याची छाप नसलेला .
ते सारे आमच्याहून ६ ते १५ वर्ष मोठी होते
जणू आमचे आदर्शच अनेक बाबतीत
अभ्यासातील सिंसेरिटी मी राजू कडून घेतली
स्वभावातील मोकळेपणा मैत्री भावना 
ही मी अशोक कडून घेतले
तर  व्रात्यपणा खोडकरपणाचे धडे 
मी प्रदीपकडून घेतले

त्यापैकी विजयचा संबंध लहानपणी आला नाही 
तो भेटला ते ठाण्याला राहायला आल्यावर.

दिलीप फार अगोदर गेला 
त्याला बहुदा हृदयाचा आजार असावा
काही वर्षांपूर्वी विजय गेला.
आणि आज कळले अशोक ही गेला .
खरतर आता आताच अशोकने 
सत्तरी पार केली होती .
अन् तो खूप फिट होता.

अशोकचे व्यक्तिमत्त्व खूप लाघवी होते .
मध्यम बांधा ,कुरळे केस ,खास खर्जातला आवाज ,
मधाळ ,मोकळे ,हसतमुख बोलणे
स्वरात आर्जव  प्रेम असलेले
जणू शहाळंच वाटीत अलगद काढलेले

माझं वय लहान असल्याने त्याचाशी 
तसा वैयक्तिक मैत्री किंवा स्नेह 
वाट्याला नाही आला.
पण एक मैत्र मनात सहजच रुजले होते

महाडला कित्येक वर्ष जाणे झाले नाही .
पण जोवर महाडमध्ये 
अशोक कोकणे आहे तोवर 
महाडचे दार सदैव उघडे आहे असे वाटत होते .

कोकणे यांच्या पुढच्या पिढ्या 
आता तिथे नांदत आहेत, सुखाने नांदतील
कोकणे यांच्या त्या लांब रुंद घरात 
एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा वास करत आहे .
कोकणे आजी आजोबा ताई भाई 
अन त्यांची ही पाच मुले .
एक गोकुळ होते .
तसा तर आयुष्यातील सव्वाचार वर्ष 
हा काळ तसा फारसा मोठा नाही 
पण लहानपणातील 
वाढत्या उमजत्या वयासाठी 
तो फार मोठा टप्पा होता.

अशोकला आयुष्यात पुन्हा भेटणे 
झाले असते की नाही माहीत नाही.
पण त्याच्या जाण्याने काही तरी 
आतून तुटल्याची भावना उमटते 
अस्वस्थ करून जाते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .






मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

प्राजक्त

प्राजक्त
*******
ओघळे प्राजक्त मुक्त निरासक्त 
गंध उधळत आकाशात 

इवल्या फुलाचे इवले जीवन 
साफल्य भरून काठोकाठ 

कुणी देवदारी कुणी अडगळी 
जीवनाची वारी दिवसाची 

तिथे धावे काळ हजारो पटीत 
स्थिर हे जगत कदाचित 

गूढ काळ वेळ मिती संकल्पना 
सुगंध जीवना ओतप्रोत 

कुण्या जीवनाचे काय परिमाण 
सारे क्षणक्षण जोडलेले 

विक्रांत बहर तीस लाख कोटी 
देहात नांदती  प्राजक्ताचे 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शिकार


शिकारी
******"
ते असतात उभे राजरोस पणे 
हातात घेवून फासे 
अन् करतात 
कधी सावजाची शिकार 
कधी शिकाऱ्याची शिकार
कधी हकाऱ्याची शिकार 
अन् कधीतरी श्वापदचीही शिकार

खरंतर स्वापदच भरत असतात 
त्यांची पोट त्यांची खिसे 
त्यांचे घरदारही 
आणि केवळ 
फासे हातात दिसतात म्हणून 
तेच शिकारी नसतात 

अन त्या शिकारीचे वाटे 
पोहचावे लागतात त्यांना वरपर्यंत 
त्या फासाची मालक वेगळेच असतात 
आणि फासे मिळवण्यासाठीही 
टपलेले असतात अनेकजन 
अन हो त्या फासांचे भावही असतात 
लिलावही होतात.

फासापेक्षा सुद्धा 
फासाच्या जागाच महत्त्वाच्या असतात
रहदारी धावाधाव गडबड 
लुटालुट भांडाभांडी असेल ,
आणि भांडणारे असतील 
जितके गलेलठ्ठ चरबीयुक्त मालदार 
तेवढी अधिक मजा येते शिकारीला.

काय म्हणता 
ते प्रामाणिक कर्तव्यदक्ष 
समाज हितैषी वगैरे वगैरे 
असायला हवेत
अहो शब्दांना पण शिव्या लागतात .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज स्मरण

श्री. नृसिंहसरस्वती स्वामी महाराज स्मरण
(गुरुप्रतिपदा)

भक्त कल्पद्रुमा नरसिंह देवा 
आनंदाचा ठेवा भक्तास तू ॥१

इह परलोकी करुनी संतुष्ट 
सांभाळशी भक्त आले जे ते ॥२

कुणी पीडा झाले ऋणी अडकले
आपदी पडले संसाराच्या ॥३

देऊनी आधार सकाम भक्तीचा
चरित्र ग्रंथाचा  सांभाळले ॥४

कोणी मोक्षास्तव जाहले व्याकुळ 
पहाया प्रेमळ गुरुमुर्ती ॥५

तया तूच देवा दावलीस वाट 
दिले हृदयात स्थान स्थिर ॥६

सदैव निर्मळ भक्तीला विकला 
अंकित जाहला  निज भक्ता ॥७

विक्रांत तुझिया दारीचा सेवक 
निश्चित निशंक सर्वकाळ ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कृपा सिंधू

कृपा सिंधू
*******
काय मी कुठला दिसेल का तुला 
जीव हा  क्षीणला दत्तात्रेया

रोगी भोगी सदा वृती अडकला 
चित्ती हरवला मोहामध्ये

किती पुण्य राशी केल्यासी पावन 
हृदयी देऊन स्थान त्यांना 

किती हीनदीन करुणा करून 
घेतले ठेवून चरणाशी 

थोडा मजसाठी होई गा उदार 
करी भव पार अज्ञाचा या 

विक्रांत मनीचे  पुरव गा आर्त  
स्वामी तू समर्थ कृपा सिंधू

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

निरंजन

एक निरंजन दोन सुखी तीन . . . 
*""**,''''***
एक निरंजन चाले निरंतर 
जाणून अंतर नसलेले 

दोन जीवलग सुखात चालले
बहुदा घडले होते इथे

कधीतरी कुणी  होऊनी तीन
उगाच भांडून श्रम केले

तयात रंगून कुठले साधन 
झाले पर्यटन व्यर्थची ते 

शिणल्यावाचून मुळी ना शिकतो
असतो मूर्ख तो कळू आले 

अगा अवधूता छान शिकविले 
मार्गास लागले आपुल्या तू

आता यावर करून फकीर
घेई दारावर  बोलावून 

मग मी तल्लीन तुझ्यात होऊन 
तुझाच होऊन जाईन रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

खिताब

खिताब
******
रात्रभर ओरडणारे भुंकणारे  कुत्रे 
पहाटे पहाटे निजले आहेत 
त्यांचा सीमावाद भांडणे जणू 
आताच जराशी निवळली आहेत
 मुन्सीपालटीत दरवर्षी टॅक्सचे 
हजारो रुपये भरून वैतागलेले नागरिक 
कानात कापसाचे गोळे घालून
जरा जरासे पडले आहेत 

निवडून आलेले सरदार इथे 
जवळपास मुळीच राहत नाहीत 
त्यांच्या राजमहालात राजवाड्यात 
कुठलेही आवाज घुसत नाही 

नागरिक कुत्रे मारू शकत नाहीत
 तेवढी हिम्मत नसते त्यांच्यात
नागरिक तोंड उघडू शकत नाहीत 
कारण कुणी ऐकत नसतात 

मग सकाळी कानातील गोळे काढत 
तारवटलेल्या डोळ्यांनी 
ते आपली बस किंवा ट्रेन पकडतात
अन ऑफिसात डुलक्या घेतात 
मग कधी बॉसच्या तर कधी पब्लिकच्या 
शिव्या फुकट खात राहतात
भुंकणे ऐकणे, व्यर्थ जागणे,शिव्या खाणे 
अन दुर्लक्षित राहणे 
जणू एक एक त्यांचा खिताब असतो 
अंगवळीने पडलेला 
चपलेत टोचणाऱ्या खिळ्यागत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

दान

दान
****
देवदारी कामना करू नये भक्तांनी
देवदारी याचना करू नये ट्रस्टींनी 

ताट प्रसादाचे उगा पुढे पुढे करूनी
घालू नये गळ घ्या हो घ्या हो म्हणूनी 

दानपेटी देवापुढे मांडू नयेच कोणी 
हो जरा बाजूस द्या आडोश्या ठेवूनी

मान्य पैसा लागतोच संस्था चालवायला 
जागा सुरक्षा नोकर व्यवस्थित ठेवायला 

खरे तर ते चालवणे देवा का कठीण असते 
जगदीश तो सर्वव्यापी त्या काय हवे असते 

दान करा पुण्य धरा हास्यास्पद आहे सारे 
मूर्ख आहेत फसणारे आणि ते फसवणारे .

अन्नदान तुळा दान भिन्न पूजा थाळी दाम 
हे आहे व्यवस्थापन आणि यात नाही राम 

अहो डोळे मिटून दान घ्यावे आणि द्यावे 
देवामध्ये पै पावतीला नच की येऊ द्यावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

वृक्ष

वृक्ष
***"

 साऱ्या वाटा देहातून होत्या मनी उतरत 
 शून्यातून एक एक  तारा होता उगवत

हरवले श्वास तरी  प्राण होते झंकारत 
स्पंदनात चैतन्याच्या गूढ गीत उतरत .

भान होते भानावर नि जीव फक्त पाहत
एक वाट अगम्यशी कुणीतरी चालवत 

असे भास विलक्षण जागोजागी पडलेले 
महापूरी शब्द ओले तरी ओठ तहानले .

असणेच जड होते जणू मार्गी अडलेले 
आणि तेच निरुपाय प्रतीक्षेत थांबलेले 

थिजलेली वेळ तरी काळ पुढे चाललेला
अन् वृक्ष वठलेला मातीसाठी आसुसला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

तो गेल्यावर

तो गेल्यावर
*********
तो होता तेव्हाही 
काही फरक पडत नव्हता आम्हाला 
तो गेला तरी 
काही फरक पडत नाही आम्हाला

त्याचं असणं 
जसं त्याच्यासाठी होतं 
आणि त्याच्यासाठी संपलं

आमचंही आमच्यासाठी आहे 
आमच्यासाठी संपेल
अन हे जग तसंच चालेल .

त्यांनी केलंही असेल कुणासाठी काहीतरी
त्या उपकारकर्त्याची जाणं
देईल दुःख त्या कुणालातरी

आम्ही दुरुस्थ तटस्थ 
त्याच्या दुनियेत नसलेले 
तरीही कोणीही असा अचानक 
आणि अशा रीतीने जाऊ नये 
असंच मनाला वाटतं .
आणि मन हळहळतं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

जन्म जीवन मरण

जन्म जीवन मरण 
***************
लाखो स्वप्न मोडतात चहुकडे विखुरतात 
तुटूनिया फांदी फांदी वृक्ष पुन्हा फुलतात 

मुळे खोल घुसतात माती पुन्हा धरतात 
जीवनाची ओल जीवा हिरवी स्वप्नं देतात 

पुन्हा पुन्हा वाढणे आणि पुन्हा पडणे 
आघातांच्या वेदनांनी रान सारे जागवणे 

हा प्रवाह अविरत घडे जीवाच्या ठाई 
पराधीन वाटते कधी सुटकेचा मार्ग नाही

पण मरण अंत कधी नसतोच जीवनाचा
नि जन्म ही सुरुवात भ्रम असतो दृष्टीचा

या साऱ्या दिसण्याला अर्थ गूढ एक असतो
झेलतांना वार सगळे जन्म अवघा कळतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

जाणणारा

जाणणारा
*******

सर्व काळी सर्व रूपा धरूनिया आहे कुणी 
असे तत्व अगोचर जाणले का काय कुणी 

जाणण्यात जाणणारा पूर्ण असे बुडलेला 
जाणण्याचा भाव तरी असे मनी उगवला

उगवते जग डोळा तीन रुपी तिन्ही वेळा 
काय गुणातीत दिसे इथे कुणा रंगलेला 

कळण्याचा भ्रम सारा काचेवरी जणू पारा 
प्रतिबिंबा आणी काय खरोखर कोणी घरा

खरे काय खोटे काय कळाया उपाय नाही 
प्रश्नासवे उत्तराला  घेतसे गिळून काही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

कहाणी

कहाणी
*****
दत्त सुखाचे ठेवणे दत्त मुखाचे मागणे 
दत्त जीवाचे जगणे सर्वकाळ ॥
दत्त आयुष्य वेचने दत्त भोगते भोगणे 
दत्त सारे ओलांडणे जमविले ॥
 दत्त प्रेमात वाहने दत्त सुखात निजणे 
दत्त विरही रडणे घडे  नित्य ॥
दत्त नामाचा गजर दत्त कीर्तीचा जागर
दत्त प्रीतीचा पाझर फुटो मनी ॥
दत्त उदो लय स्थिती दत्त अवघी समष्टी 
दत्ता वाचून जगती अन्य नाही ॥
घडो दत्तमय जीणे सरो उगा भटकणे 
दत्त स्मरणे कारणे जन्म जावो ॥
दत्ता विक्रांत कहानी तवपदी हरवूनी 
जावो कृतार्थ होऊनी इये वेळी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

स्वामीभेट


स्वामी भेटी
********
कृपेचे कोवळे चांदणे पडले 
स्वामी भेटी आले 
अकस्मात
 नसे घरदार नसे ध्यानीमनी 
भाग्य उठावणी 
केली काही 
तोच स्वामीराय तोच ज्ञानदेव 
आला अनुभव 
अंतरात 
शशी चंद्र नावे जरी आन आन 
कैवल्याचे दान 
तोच एक 
विक्रांत भिजला चिंब अंतरात 
न्हाईला सुखात 
वरदायी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

वर्ख

वर्ख
*****
 त्या तुझ्या धुंद मधुर स्मृती 
अजूनही मनी करतात दाटी 

 कुठल्याही सांत्वनेवाचुनी 
तया ठेवतो मी कुरवाळूनी

सुंदर शापित असते विराणी 
जातेच हृदया चटका लावूनी 

स्पर्शातून कधी फुलली गाणी 
स्वप्न हरखली विभ्रम होऊनी 

सुवर्ण वर्खात सजली नक्षी
गेले कुणी जणू गोंदवून वक्षी

तेही जगणे असते मानवी 
पायी थबकते लहर लाघवी

ओंजळीत मग उचलून पाणी 
तया सागरास द्यावे परतुनी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 


मंगळवार, २० जानेवारी, २०२६

कवितेसाठी कविता

कवितेसाठी कविता
**************
इतक्या लिहल्यावर कविता 
वाटते कधी पुरे झाल्या कविता 
तसेही फारच कमी लोक 
इथे वाचत असतात कविता

तसे तर मी लिहिल्या नाहीत 
कोणी म्हटले म्हणून कविता 
जरी कुणासाठी कधीतरी 
मनात उमलून आल्या कविता 

किती ही आंदोलने मनात
येतात रूप होऊन कविता 
रूप रस गंध स्पर्शापलीकडे
हलकेच मला  नेते कविता 

कवी होणे खरीच भाग्याचे असते 
सांगते मलाच कधी कविता 
आणि पुन्हा पुन्हा गळ घालते
शब्दात त्या रुजवायला कविता 

माहित नाही माझे अजून किती
देणे तुला बाकी आहे कविता 
हे ऋण वाचेचे फेडतोय मी 
लिहून ही कवितेसाठी कविता

तरीही अनेकदा वाटतेच मला  
पुरे झाले आता लिहणे या कविता 
आणि  उरलेले दिवस हे आता
जगावे फक्त होवून कविता 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

सोमवार, १९ जानेवारी, २०२६

प्रस्थान

प्रस्थान
******
घडू दे शेवट आता प्रवासाचा 
दिस अखेरचा गोड करी ॥१
नाही बुद्धिवान नाही धनवान 
जगलो लहान सामान्यसा ॥२
नाही कीर्तीवंत नाही यशवंत
कृपेने वाहत तुझ्या आलो ॥३
पातलो रे सुखे लागती जीवना 
भोगले दुःखांना सवे काही ॥४
जैसे चार-पाच जगती जीवनी 
भिन्न न त्याहूनी काही अन्य ॥५
उतलो मातलो नाही रे जीवनी 
अवघी करणी देवा तुझी ॥६
तुवा सुखरूप ठेविले जगात 
नेई रे परत तैसाची रे ॥७
परि नाही घडली काही तुझी सेवा 
खंत उरी देवा एवढीच ॥८
पुढील मुक्कामी जाणे भेटीविन
ठेवणे प्रस्थान बरे नाही ॥९
घडो निरोपाचे तेवढे दर्शन 
विक्रांता मागणं हेच आता ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १८ जानेवारी, २०२६

सागरतीरी (शिरगाव पालघर)

सागरतीरी (शिरगाव पालघर)
***********
त्या हजारो लाटातून
खोल खोल पाण्यातून 
होता उमटत एक ध्वनी 
रे मी वाहतो तुझ्यातून 

युगोयुगी मीच आहे 
वाहत साऱ्या या जीवनी 
हिंदोळणाऱ्या झाडामधूनी
सळसळणाऱ्या  रक्तातूनी

मग मीच माझ्या उगमाशी
उभा राहिलो भान हरपूनी 
ऐकत नाद उगा आतला 
गेलो त्यात  खोल हरवूनी 

तो खेळ खळाळ तरंगांचा 
तो निशब्द मनाच्या मौनाचा 
तो स्पर्श निसटत्या वाळूचा 
मी न उरलो मग कुणाचा 

गेला दिनकर पलीकडे अन् 
उरे पाण्यावरती झगमग 
वात भारला पाणी भारले 
जणू दाटले माझ्यातच जग 

दूर कुठे त्या झाडामागे 
 जग इवलेसे हाका मारत 
अन मावळत्या क्षितिजावर
एक चांदणी होती चमकत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

लायकीचा

कर लायकीचा
**********

कृपेविना ग्रंथ तुझा 
कळणार कुणा देवा 
अधिकाराविना काय 
कधी प्राप्त होतो ठेवा 

या शब्दांशी खेळतांना 
अर्थापाशी थांबतांना 
भावभावी गुंततांना 
घडे काही बोलवेना

शब्दातून तूच जणू  
उतरशी हळू मना
ज्ञाताच्या पल्याड काही 
देसी उघडूनी क्षणा

मोती मोती वेचतांना 
जन्म वाटे किती उणा 
म्हणूनिया तुझ्या पायी 
वाटे यावे पुन:पुन्हा 

सोडूनिया यत्न सारे 
उभा रिक्त ओंजळीचा 
विक्रांता या दयाघना 
कर तुझ्या लायकीचा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

देई बा दत्ता

देई बा दत्ता 
*****
प्रेम ना सुटावे कधीच मनीचे 
ध्यान ना मिटावे कधीच उरीचे

पद मिळो मज कधी सन्मानाचे
घोट कधी कडू वा अपमानाचे

कश्याकशात या गुंतल्या वाचून 
स्मरण असावे तुझिया रूपाचे

जे काही असेल माझिया भल्याचे
तुझ्या पथावर दृढ चालण्याचे

देई बा दत्ता केवळ तेवढे 
सुटू दे जगाचे पाश हे फुकाचे

मागतो विक्रांत सारखे मागणे 
तुजला दयाळा कौतुक प्रेमाचे 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

अगा ज्ञानदेवा

अगा ज्ञानदेवा
***********
अगा ज्ञानदेवा माझिया माहेरा 
गुज या लेकरा दिलेस त्वा ॥
 
तुझिया शब्दात नांदतो सुखाने 
पांघरतो गाणे स्वानंदाचे ॥
 
मज दिसे ज्ञान तुवा मांडलेले 
अर्थ उघडले हळुवार ॥
 
काही मी सेविले काही शृंगारिले 
जगी मिरविले किती एक ॥
 
परी पाहतो मी मजला वेगळा 
अजूनही उरला मागे काही ॥
 
आता एकसरा एकरूप करा 
पुसूनी पसारा संसाराचा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कळेना


कळेना
*******
कळेना मजला स्वीकार नकार 
तरी दारावर उभा आहे ॥

कळेना मजला आवडनिवड 
तरी धडपड रिझवाया ॥

कळेना मजला काही देणे घेणे 
तरीही धरणे धरीतसे ॥

कळेना मजला प्रीतीत जगणे 
तरी आळवणे करीतसे ॥

आता प्रियोत्तमा येऊ दे करुणा 
करतो याचना कळण्याची ॥

देई प्रेम खुणा काही अंतरात 
धाडा ना परत मागणी ही ॥

पाहतो विक्रांत नाम गुणातीत 
सर्वव्यापी दत्त भक्तीभावे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १० जानेवारी, २०२६

नर्मदा मैयेस

नर्मदा मैयेस
*********
ती तिथी तुला भेटायची अजून उगवत नाही 
ठाव मला सारे की मर्जीविना तव काही नाही 

किती दावशी प्रलोभने किती आणशी अडचणी 
माई अजान मूर्ख असा मी किती राहू अडकूनी

बळ ना देही जरी जाणतो उगाच धाडस करतो 
सांभाळशील तू नक्की पुन:पुन्हा मलाच सांगतो

कधी वाटते तुज ना ईच्छा मजला बोलावयाची 
महा ओघ मी पापाचा आवड तुज ना धुवायची

ठीक आहे असो तेही तर घे तू सेवा पुण्यात्मांची 
जर कदाचित निवळलो करेन गोष्ट तुला भेटायची

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

चांगदेव पासष्टी

चांगदेव पासष्टी
***********
(आदरणीय  सौ.मनीषा ताई अभ्यंकर यांचा ग्रंथ वाचला 
खूप सुंदर अर्थ उलगडून सांगणारा ग्रंथ आहे.)

चांगदेव पासष्टी ज्ञानी योगीयाचां 
संवाद सुखाचा अद्भुतसां ॥१
पासष्टच ओव्या सार वेदांताचा 
शैव सिद्धांताचा अर्क इथे ॥२
वदे ज्ञानयोगी भक्तीत भिजला .
 योग अधिष्ठीला मूर्तीमंत ॥३
ऐके योगीराज काळ जिंकलेला 
सिद्धी पातलेला सर्व इथे ॥४
एक ज्ञानज्योत दुजा समईच 
भरली सुसज्ज अंतरात ॥५
तयाच्या भेटीत प्रकाश निघोट
दाटला अफाट शब्दरुपे॥६
जेणे मुक्ताईच्या कृपेचे लाघव 
पूर्ण चांगदेव करीतसे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

गवसणे


गवसणे
******
कुणाला हवाय कशाचा फायदा 
करून वायदा मला मोठा ॥

कुणाला नकोय कुणीच साथीला 
एकट्या वाटेला सुख थोर ॥

तरी भिडतात पथ एकमेका 
कळेना अवाका जीवनाचा ॥

सारे देणे घेणे ठाऊक दत्ताला
 चालणे वाटेला भाग असे ॥

कळावे कळणे थांबावे धावणे  
व्हावे गवसणे गाठीतले ॥

चाले जगताचे तेच चक्र जुने 
चालू दे फिरणे त्याच्या गती ॥

विक्रांत पाहतो घडते घडणे 
वाहते वाहणे प्रवाहात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

जिणे

जीणे
,****

ऐसे घडो जीणे वाट नसलेले 
गवताचे पाते पुन्हा रुजलेले

तीच माती काळी तेच दव ओले 
ओंजळीला वेड्या हाव नसलेले 

धन मान सारे वाऱ्याच्या झुळका 
आकाशी विरल्या एकांतीच्या हाका, 

यशोगाण सारे पाण्याच्या लहरी 
येती अन जाती असंख्य सागरी 

पाऊलांना नसे काही गाठायाचे 
उबदार नर्म सुख मुक्कामाचे 

रोज नवा सूर्य सोनेरी सकाळ 
अंतर्बाह्य शुभ्र प्रकाश झळाळ 

माझे पण मला भेटावे नव्याने 
कालच सरावे कालचे असणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

स्पंदन

स्पंदन
******
मृदुंग वाजत आहे 
तबला घुमत आहे 
स्पंदनात अवघ्या या
मी मला पाहत आहे .

टाळांचा खणखणात 
कानात दाटत आहे 
टाळ्यांचा दुमदुमणे 
छातीत घुसत आहे .

हा देह मातीचा अन 
आकाशी विरत आहे 
तरंगातून स्वरांच्या 
चौफेर उधळत आहे 

एक स्पंदन शून्यसे
मला गवसत आहे 
आतून वा बाहेरून 
दार ठोठावत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

मावळणे

मावळणे
*****
मावळणे मनाचे या मनास पटत नाही 
रंग पश्चिमेचे मंद उरी उतरत नाही 

वाटा डोळ्यातल्या त्या डोळ्यास भेटत नाही
अन् भटकणे खुळे थांबता थांबत नाही 

ती सांज सागरतीरी मुळीच सरत नाही 
चित्र गोठलेले जुने आकाश पुसत नाही 

सारेच चांदणे नभीचे नभ उधळत नाही
अन कोसळत्या उल्के त्या नाव असत नाही 

व्यवहार जगाचे या जगास सुटत नाही
मूल्य हृदयाचे अन कोणास कळत नाही 

होते येरझार तरी जाणीव सुटत नाही 
आस असण्याची अन् मिटता मिटत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ४ जानेवारी, २०२६

तो भेटतो

तो भेटतो
*******
तो न भेटतो जपाने 
तो न भेटतो तपाने
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥१

तो न भेटतो पूजेने 
तो न भेटतो गायने 
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥२

तो न भेटतो बलाने 
तो न भेटतो धनाने 
तो भेटतो केवळ रे 
फक्त त्याच्याच कृपेने ॥३

तरी सारी कवाईत 
भाग आहे रे करणे 
अनुसंधानाचे दोर 
हाती धरून ठेवणे ॥४

हाती आहे नांगरणे 
बीज पेरून ठेवणे
आणि राखण करणे 
नाही पाऊस पडणे ॥५

तो भेटतो सदा तयाला 
हवा आहे तो जयाला 
पण त्या ही भेटण्याला 
नियम नाही कुठला ॥६

तो भेटतो याच क्षणी 
किंवा नच युगोयुगी 
परी निराशे वाचूनी 
ठेव प्रतिक्षा तू जागी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

हरवला दत्त

हरवला दत्त
***
हरवला दत्त इथल्या गर्दीत
निघाला शोधीत निवाऱ्याला ॥१

पावलोपावली लागतात ठेचा 
पथ माणसांचा हरवला ॥२

घुसमटे श्वास सोनियाच्या धुरी
क्रूर वाटमारी जागो जागी ॥३

कोटी प्रार्थनाचा चाले गलबला 
स्वर थकलेला हर एक ॥४

तारावे कुणाला मारावे कुणाला
हात थबकला करुणेने ॥५

जगून मरणे मरून सुटणे 
घट्ट तरी जिणे लोंबकळे ॥६

कर्म दरिद्रयाची रेषा या शहरा ?
काय देवा झाला निरुपाय .? ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

दातृत्व

दातृत्व 
******
हे रंग तुझे जीवना मला कळत नाही
ही लाट सुखाची अन् हाती मावत नाही ॥

धुसरल्या आकाशात जीव उंच उडू जाई 
बंध अदृष्य रेशमी मन हे त्यातही पाही ॥

क्षणिकाचे भान जरी लाटा येती आणि जाती
या कल्लोळी भावनांच्या वादळे उठती किती ॥

तुटलेले दोर कैसे पुनरपि जुळू येती 
भरकटल्या पतंगा पुन्हा मिळे कैसी गती ॥

हे पर्व किती दिसांचे मजला ठाऊक नाही 
चक्र दिन रजनीचे मनातून जात नाही ॥

पुसायचा नाही कधी काळोख दाटला मनी मिरवायचा ना कधी प्रकाश आला भरुनी ॥

हलकेच मला हे तू सांगून गेलास कानी
आज तुझ्या दातृत्वाने गेलो विस्मित होऊनी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

आळंदी जाईन

आळंदी जाईन 
**********

अगा मी जाईन आळंदी राहीन 
रोज गं पाहीन ज्ञानदेवा ॥

अगा मी रंगेन संतांना भेटेन 
पायी लोटांगण घेत तया ॥

अगा इंद्रायणी नित्य मी न्हाईन
पुण्याच्या जोडीन महाराशी ॥

अगा ज्ञानदेवी नित्य पारायण
 अन्न हे सेवेन  आत्मयाचे ॥

अगा मी होईन तेथला किंकर
सेवेशी सादर सर्वकाळ ॥

ऐसे ज्ञानदेवा कर माझे आई 
याहून गे काही इच्छा नाही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...