***********
त्या हजारो लाटातूनखोल खोल पाण्यातून
होता उमटत एक ध्वनी
रे मी वाहतो तुझ्यातून
युगोयुगी मीच आहे
वाहत साऱ्या या जीवनी
हिंदोळणाऱ्या झाडामधूनी
सळसळणाऱ्या रक्तातूनी
मग मीच माझ्या उगमाशी
उभा राहिलो भान हरपूनी
ऐकत नाद उगा आतला
गेलो त्यात खोल हरवूनी
तो खेळ खळाळ तरंगांचा
तो निशब्द मनाच्या मौनाचा
तो स्पर्श निसटत्या वाळूचा
मी न उरलो मग कुणाचा
गेला दिनकर पलीकडे अन्
उरे पाण्यावरती झगमग
वात भारला पाणी भारले
जणू दाटले माझ्यातच जग
दूर कुठे त्या झाडामागे
जग इवलेसे हाका मारत
अन मावळत्या क्षितिजावर
एक चांदणी होती चमकत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️