सोमवार, १६ मे, २०२२

भोंदू गुरू

भोंदू गुरू 
*******:

जर तुमचा भोंदू गुरू 
तुम्ही टाकलात तर 
पडाल उघड्यावर 
म्हणून घाबरू नका 

डोळे घट्ट बंद करून 
वर भीतीची पट्टी बांधून 
सूर्य उगवणार नाही म्हणून 
स्वतः ला बजावू नका 

मान्य आहे मला की 
तुमची भक्ती आहे वादातीत 
तुम्ही आहात पूर्ण समर्पित 
पण लुटले जाऊ नका 

चुकतो आपण खूपदा 
वस्तू विकत घेतानाही 
म्हणून बाजार टाकत नाही 
तो तुमचा शोध थांबवू नका 

होतात अपघातही कधी 
गाडी चालवता चालवता 
चुकतो सिग्नल आणि फाटा 
म्हणून रस्त्यास दोष देऊ नका 

हा शोध महत्त्वाचा आहे 
तो लागो अथवा न लागो 
गंतव्य मिळो अथवा न मिळो 
पण चालणे सोडू नका 

इथे दु:ख अन वंचना आहे 
तितिक्षा अन परिक्षा आहे 
पण एक पूर्णता नक्की आहे 
ती अमोल संधी डावलू नका 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...