ती.. युक्रेन काश्मिर मधली/आणि कुठली कुठली. . .
**************::*
कोसळून पडू नकोस
हे माझ्या प्रिय घरा
ढासळून जाऊ नकोस
हे माझ्या प्रिय घरा
धरून ठेव
आधाराचे पिलर
भिंती घट्ट धर
विटा पक्क्या धर
धरुन ठेव छत
घट्ट बीम धर
आधाराचे पोलाद
गळल्या वाचून
गंजल्या वाचून
ठेव वाचवून
माझ्यासाठी स्वत:ला
ठेव राखून
मी नक्की येईल
घरी परत
तेव्हा तू माझे
कर स्वागत
तुटतील दारे
कडाडत
पडतील खिडक्या
धडाडत
फुटतील काचा
खच होत
कोसळतील तावदाने
निखळत
मला माहित आहे
हौसेने लावलेले रंग
पडतील काळपट
धूराने दारूने
उडणाऱ्या धुळीने
तेज हरवत
जमवलेले सामान
जाईल चोरीला
पडेल कुणा उपयोगाला
ते ही बरेच पण
काही विखुरले जाईल
तर काही तोडून मोडून
फेकले जाईल बाहेर
हरवेल सार
तो सोफा तो पियानो
तो शोकेस तो ऑर्गन
कदाचित होतील
छिन्न भिन्न.
वेळ नाही मला
ते डीश उचलायला
बेडशीटची घडी घालायला
गाद्या झाकायला
नाईलाज आहे माझा
असे एकटे सोडते तुला
आकाशात घरघर
होऊ लागली आहे
रणगाड्यांची धडधड
ऐकू येऊ लागली आहे
सायरन वाजू लागले आहे
आता त्वरा केली पाहिजे
मला हवे निघायला
हे कुशीतले बाळ
हवय सांभाळायला
पण निघता निघता
एवढेच सांगते
हे माझ्या घरा
तू म्हणजे मीच आहे
तुझ्या कणाकणात
अन कोपऱ्या कोपऱ्यात
माझे अस्तित्व आहे
तुझ्या पासून दूर राहणे
म्हणजे माझेच
दोन भाग होणे आहे
पण मी कुठेही असेल
अन कशीही असेल
सदैव इथेच असेल
हे माझ्या प्रिय घरा.......... . .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा