रविवार, १५ मे, २०२२

भगवान गौतमबुद्ध

भगवान गौतम बुद्ध
**********
जर त्या युवराजाला 
नसतेच पडले प्रश्न 
जन्म मृत्यू अन जरेचे 
नसतेच उठले वावटळ 
अंतरात मुमुक्षुत्वाचे
तो राहिला असता रममान 
आपल्या सुखोपभोगात 
गुरफटलेला सुंदर पत्नीत
रमलेला छोट्या बाळात  
राजोपभोगात विलासात 
जसे राहिले जगले आणि मेले 
हजारो राजे-महाराजे 
तर हे जग 
आहे त्यापेक्षा 
खूपच विद्रूप झाले असते 

ते एक फुल फुलले पृथ्वीवर 
अन हजारो हृदयात 
नंदनवन फुलले 
असे नाही की या देशात 
संत झालेच नाहीत 
तत्त्वज्ञ जन्मलेच नाही 
योगी उपजलेच नाहीत 
ही भारत भूमी तर अशा 
अगणित रत्नांची खाणच आहे .
पाहता पाहता 
डोळे दिपून जावीत 
मोजता मोजता 
आयुष्य संपून जावीत 
पण हे रत्न वेगळेच होते 

त्यांनी प्रतिपादन केले सत्य 
सत्यावर असलेला प्रत्येकाचा हक्क
 नाकारली वर्ण व्यवस्था 
नाकारली जातीव्यवस्था 
नाकारला लिंगभेद 
आणि यातूनच जन्माला आला 
एक संपूर्ण मनुष्य धर्म 
प्रखर  प्रज्ञेवर आधारलेला 
प्रचितीस सत्य मानणारा 
करूणेने ओतप्रोत भरलेला 
सु - शीलतेने नटलेला 
तेथे स्पर्धा नव्हती 
प्रचार नव्हता 
बळजबरी ही नव्हती 

तो आकाशात पाझरणारा 
पूर्ण चंद्र होता 
भर वैशाखात शांती देणारा 
निशीराज होता 
हृदयात मांगल्य पवित्रता 
उदारता भरणारा 
सारी धग शोषून घेणारा 
शुभ्र मोगरा होता 

तो गौतम तर होताच कधी 
तो बोधीसत्व ही होता कधी 
पण भगवान बुद्ध झाला तेव्हा 
त्याच्यातून पाझरला 
तो दिव्य प्रकाश 
मानवाच्या मुक्तीचा 

दु:खातून मुक्ती
अज्ञानातून मुक्ती 
अंधकारातून मुक्ती 
भेदाभेदातून मुक्ती 
उच्चनीच स्त्री पुरुष 
सार्‍या भेदातून मुक्ती

म्हणूनच 
माणुसकी जाणणारा 
प्रत्येक मनुष्य करतो नमन 
शतवार त्या महायोग्याला 
महावीराला महानायकाला 
भगवान श्री गौतम बुद्धाला !
अन ध्यानाचे फुलुुन आलेले 
फुल अर्पितो त्या पद कमलाला !!

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...