शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

दर्शन

दर्शन
*****
आलो तैसा गेलो कळल्या वाचून
घडले दर्शन विठ्ठलाचे ॥१
 वाया न हे जावे क्षण दर्शनाचे
म्हणून डोळ्यांचे द्वार टक्क ॥२
चालणे कुठले कुणी ढकलले 
शरीर वाकले यंत्रवत ॥३
पदासी त्या हात लागले क्षणात 
सर्वस्व तयात ओतले मी ॥४
पुढे चार-पाच पाऊले चाललो 
माघारी वळलो एक वार ॥५
डोळे न भरले शब्द नुमटले 
हात जोडलेले होते फक्त ॥६
काही मिळवणे नव्हते कशात 
खोलवर रिक्त- पण होते ॥७
पुरवली हौस पुन्हा पांडुरंगा 
रहा अंतरंगा व्यापुनिया. ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामी स्वरूपानंद

स्वामी स्वरूपानंद ************** अगा स्वामीराया पावसच्या देवा  जीवाचिया जीवा प्रियोत्तमा ॥१ ऐकता तुमच्या गोड आठवणी  जातसे भरुनी ...