१५ ऑगस्ट निमित्त -भारत देशास
**************************
हे माझ्या सुंदर देशा तुझ्यासाठी मी फारसे काही करू शकलो नाही.
घरदार संसार पोट यापलीकडे
जीवनात काही घडलेही नाही
पण मला समाधान एकाच गोष्टीचे आहे .
तुला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या कीड्यात
मी समाविष्ट झालो नाही.
हे माझ्या पवित्र देशा
तुझ्यासाठी उज्वल अथांग दैदीप्यमान
असे काही मी करू शकलो नाही.
कदाचित तेवढी माझी क्षमता नसेलही
पण नाकासमोरील रेष मी कधीही चुकवली नाही
कुणाचे वाईट केले नाही कुणाचे शापही घेतले नाही
हे माझ्या महान देशा
ज्याने तुझे यश कीर्ती महिमान वाढेल असे काहीही महत्कार्य माझ्या हातून खरेच घडले नाही.
पण माझ्यातील भारतीयत्वाला मी कधीही डाग लागू दिला नाही.
हे माझ्या मंगलमय देशा
या भूमीत जगणाऱ्या बांधवांचे
दारिद्र्य रोगराई दुःख
ती आर्थिक सामाजिक विषमता
मी किंचितही कमी करू शकलो नाही
पण कष्टणाऱ्या कुठल्याही कामगाराला
मी कधीही माझ्याहून कमी लेखले नाही .
हे माझ्या अद्वितीय देशा.
वायव्य उत्तर आणि पश्चिमेकडून
तुझे तोडले गेलेले लचके
यावर कुठलीही मलमपट्टी मला करता आली नाही.
तुझ्या जखमा भरता आल्या नाही
पण त्यांचे समर्थन करणाऱ्यांना मी कधीही साथ दिली नाही.
अखंड भारताचे स्वप्न माझे कधीही भंगले नाही
हे माझ्या प्राणप्रिय देशा
परधर्मात जाणाऱ्या बांधवांना मी रोखू शकलो नाही
आणि गेलेल्यांना परतही आणू शकलो नाही.
माझ्या धर्मातील जुनाट कालबाह्य रुढी
जातीय व्यवस्था यांना बदलूही शकलो नाही.
पण मी कधीही जात मानली नाही
माणुसकी धर्म सोडला नाही.
हे माझ्या गौरवशाली देशा
मी जाणतो तुझे गत वैभव आणि
तुझ्यावर ओढवलेली आजची स्थितीही
तू अजूनही संतांच्या महात्म्यांच्या
अन दृष्ट्या पुरुषांच्या स्वप्नातील भारत झाला नाही.
पण तुझ्या आत्मीक आध्यात्मिक शक्ती वरचा,
अलौकिक वारश्यावरचा
माझा विश्वास किंचितही कमी झाला नाही.
हे माझ्या जीवलग देशा
हा देश इथले धर्म ही संस्कृती पुनर्जन्म मानते
अन् या सिद्धांतावर विश्वास असलेला मी
त्या सर्व शक्तिमान परमेश्वरला प्रार्थना करतो
की मला पुन्हा पुन्हा या भूमीतच जन्माला येऊ दे.
सदैव तुझ्या ऋणात राहू दे
जोवर इथे रामराज्याचा उदय होत नाही
तोवर तुझ्या यश अन् कीर्ती साठी हा देह झिजू दे
इवल्याशा खारीगत मला तुझी सेवा करता येऊ दे .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा