शनिवार, ४ जानेवारी, २०२५

खेडेकर सिस्टर

खेडेकर सिस्टर
***********
कधी चालतांना एखादा खळाळता निर्झर  
 यावा डोळ्यासमोर अन प्रसन्न व्हावे अंतर 
तसे होते जेव्हा भेटतात कधी खेडेकर सिस्टर 
आपल्या निर्मळ हास्याचे विखुरत तुषार 
अन लाघवी बोलल्याने मिळवत प्रेमादर 
त्या होत्या वावरत एक अख्याईका होऊन 
आपल्या सोबत 
कुणाचे शत्रुत्व न घेता कुणाचे वैर न पत्करता
येते जगता शांतपणे आपल्या चाकोरीत  
याचा एक वस्तूपाठ होत्या खेडेकर सिस्टर 
कर्तव्यात कसूर नव्हती घरी आणि दारी 
म्हणून घरच्या तीनही वेली गेल्या गगनावेरी 
खरंतर जग जिंकणं सोपं असतं पण 
मन जिंकणे अतिशय खडतर 
जग जिंकायला करावे लागतात युद्ध 
पण मनं न लढताच जिंकावी लागतात
समोर ठाकलेली अंगावर आलेली युद्ध 
सीकारून त्यांना देणे कलाटणी मैत्रीची स्नेहाची 
हे कसब सहजच साधले होते त्यांना
त्यामुळे अजातशत्रूचा किताब 
सहजच शोभून दिसतो त्यांना
लहान सहान वाद मतभेद
कर्तव्यातील नियमात परखड बोलणे 
घडत असेलही कधीकाळी
 पण त्यात वैयक्तिक स्वार्थ नसल्याने 
वाद वितळायचे  शरदातील मेघासारखे 
अन उरायचे नितांत निळे मोकळे निर्मळआकाश 
सारे व्हायचे कुठल्याही अट्टाहासाविन अनायासे
 म्हणूनच हे वेगळेपण हि निर्मळता 
उमटते त्यांच्या  हास्यात मोगऱ्याच्या फुलागत 
सारे वातावरण मधुर करून टाकत 
आता हा स्मितांचा काफिला होत आहे निवृत्त 
दूर जात आहे आपल्यापासून 
त्यांना ही सदिच्छा की
तुम्ही रहा अशाच झऱ्यागत लहरत 
सुमनागत जगाला आनंद आमोद देत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

गुजगोष्टी


गुजगोष्टी
*******
कुणा फळले जन्म इथले 
जगून मेले जग सरले १

तरीही स्वप्ने जगती त्यांची 
काही उद्याची काही कालची २

रे भानावर ये लवकर 
काही खरे ना मुक्कामावर  ३

हित तुझे रे तुझ्याच हाती 
तुटू सुटू दे आतील गाठी .४

फक्त कळावे याच कारणे 
जन्म जीवन व्हावे वाहणे ५

शब्द भरणी गातोय काही 
गळाखरड ही फुकट नाही ६

 जळे काहूर आत अपार 
खरेच बाता नाहीत यार ७

कळो तुजला खुणा त्यातल्या 
 गुजगोष्टी ज्या हृदयी लिहिल्या ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १ जानेवारी, २०२५

डॉ संजय चोगले

डॉक्टर संजय चोगले
****************
जीवनात अनेक मित्र भेटतात 
काही टिकतात काही हरवतात .
काही विसरले जातात 
काळोखात अन काळाच्या ओघात 
खरच मैत्री रुजवणे जोपासणे टिकवणे
हे तेवढे सोपे नसते 
त्या पाठीमागे लागते उदार मन 
मोकळेपण आत्मीयता प्रेम आणि हळुवारपण 
दुसऱ्यासाठी कष्ट उचलण्याची तयारी 
आणि उणीवा पोटात घेण्याची वृत्ती 
हे सगळे डॉक्टर संजय चोगले यांच्यात आहे 
म्हणून तो मैत्रीचा महामेरू आहे 

असे नाही की त्याच्या आयुष्यात 
सारे काही आलबेल होते 
दारात प्राजक्ताचे सडे पडत होते 
आणि छतावर मोर नाचत होते 
संकटे दुःख यातना त्याच्याही वाट्याला आल्या 
इतर कुणापेक्षा काकणवर जास्त आल्या 
पण त्यामुळे आली नाही त्याच्या जीवनात 
कुठलीही कटूता उद्दीग्नता निराशा  
 सदैव चैतन्याचे उत्साहाचे आशेने 
भरलेला तो अश्वस्थ वृक्ष आहे ..
ज्याचे अस्तित्व असते 
जीवनाच्या प्रत्येक झुळकीला प्रतिसाद देत 
लहान सहान आनंदाने डोलत 
मॅगीच्या डिश पासून मेडिसिनच्या पुस्तकापर्यंत 
गप्पांच्या फडापासून कोरकाच्या संगीतापर्यंत 
जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी आनंद शोधला 

रुग्ण आणि रुग्णसेवा हा त्याचा 
सर्वात आवडता छंद सर्वात आवडती गोष्ट 
प्रत्येक रुग्णासाठी धावून जाणे 
त्याला मदत करणे आणि त्याला बरे करणे 
यात जे सुख असते 
ते खऱ्याखुऱ्या डॉक्टरलाच कळते 
त्या अर्थाने तो परिपूर्ण डॉक्टर आहे 

आपल्याला काय आवडते हे समजणे 
आणि त्याप्रमाणे वागायचे ठरवणे
त्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि दूरदृष्टी लागते म्हणूनच आलेले प्रमोशन नाकारून 
डीएचएची पदविका घेऊन ही 
येणाऱ्या अधिकारी खुर्चीला दूर ठेवून 
तो राहीला मस्त  त्याच्या जगातच 
त्याचा तो निर्णय किती अचूक आहे 
हे कळते आम्हाला स्वीकारून प्रमोशन 
करताना ऍडमिनिस्ट्रेशन ..

कर्म हा संजयचा धर्म आहे आणि 
सत्कर्म करणे हा त्याचा पिंड आहे
चांगल्याची आवड प्रेम आत्मीयता त्याला आहे 
त्यामुळे त्याच्या कळत नकळतही 
तो गुणराशी झाला आहे 
सेवा हा त्याचा स्वभाव आहे 
त्यामुळे तो तपो राशी झाला आहे 
असे मित्र भाग्यानेच मिळतात 
आणि मला तो भेटला आहे 
हे माझे अहोभाग्य !
निवृत्ती दिनानिमित्त त्याला आभाळभर शुभेच्छा !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

खेडेकर सिस्टर

खेडेकर सिस्टर *********** कधी चालतांना एखादा खळाळता निर्झर    यावा डोळ्यासमोर अन प्रसन्न व्हावे अंतर  तसे होते जेव्हा भेटतात कधी...