वन डे
****
माफ करा मित्रांनो थोडा रसभंग होतोय
एका दिवशीच्या मैफीलीचा रंग बिनसतोय
पण हे खरे आहे की
एक दिवस जाग येते सर्वांना
गणतंत्र दिवसाची स्वातंत्र्य दिवसाची
देशावरच्या प्रेमाची
मिरतात झेंडे मिरवतात बिल्ले
मिरवतात शुभ्र खादीचे परिधान
होतो जय जयकार वंदे मातरम
लागतात गाणी
सीमेवरच्या बलिदानाची
सिनेमातील देशभक्तीची
आणि कुठली कुठली
जुन्या वहीत लहानपणी लिहलेली
पाठ्यपुस्तकात गर्वाने गाईलेली
पण दुसऱ्या दिवशी तीच हप्त्याची बोली
अन जमणारी टक्केवारी
अडलेल्या माणसांची लाचारी
खुशी नाखुशीने होणारी पाकिट मारी
म्हणे जगण्यासाठी सारे करावेच लागते
व्यवस्थेत राहण्यासाठी वहावेचे लागते
इथे दिसे एक अर्थव्यवस्था नांदती
जी चालते ज्याच्या हाती ससा तो पारधी
या एकाच सूत्रावरती
तेव्हा बरबटलेल्या हातावर चढतात मोजे
सुंदर मखमली तीन रंगाचे
आणि समारंभ मिरवले जातात
झेंडावंदनाचे भाषणाचे गौरवाचे
आणि जे नाकारतात हे बरबटणे
प्रवाह पतित होणे
त्यांच्या माथी येते हद्दपार होणे
कठड्यात उभा राहणे
देश प्रेमाच्या गुन्हा साठी
बाकी साऱ्यांसाठी येणारच असतो
पुन्हा एक वन डे मातरम्
पुन्हा एक वंदे मातरम
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा