दार
****
माझ्या मना बंद कर दार खिडक्या हजार
लाख दृश्य जगताची
किती फसशील बरं ॥१
दिसण्याला अंत नाही
प्रकाशाची येरझार
बघ निहाळून नीट
कोण धावतो चौखुर ॥२
सारा कोंडलेला आत
तोच जगाचा बाजार
धूळ बसू देत खाली
मग दिसेल आकार ॥३
दत्त करुणा अगाध
मिटू लागताच दार
वृक्ष चैतन्याचा आत
दिसे कोंदाटे अपार ॥४
नीट पाहता शोधून
काही आत ना बाहेर
दृष्टी असून नसली
जाते हरवून द्वार ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा