सोमवार, २० जानेवारी, २०२५

ती वाट

ती वाट
*******
ती वाट तुझ्याकडे येणारी रोज खुणावते मला 
ते वळण जीवघेणे  रोज टाळावे लागते मला 

तुझ्या डोळ्यात स्वागत असेलच असे नाही 
माझे बोलणे  पूर्वी गत होईलच असे नाही 

सुखदुःखात आपण वाटेकरी ही होणार नाही 
मनी लाख ठरवून क्षितिज हाती लागणार नाही 

संकटात कुण्या एकमेकां आपण दिसणार नाही 
समांतर हे जग आपले भेट तशीही होणार नाही 

छाया टाळून  वृक्ष जातोच ना उन्हाच्या दिशेला 
जगणे वाढणे स्थिरावणे हेच तर हवे जीवनाला 

तरीही ते वळण वाकडे का पाऊलांना जड करते 
आणि ती वाट पाहून मन उगाचच कासावीस होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धुनी

धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट  जल गेले हरपून  नील रत्न सागरात परी राहिला ओंड...