बुधवार, १५ जानेवारी, २०२५

कुंभमेळा

कुंभमेळा
*******
भरत भुमीवरील श्रद्धेचे भक्तीचे अस्मितेचे 
अद्भुत दर्शन आहे कुंभमेळा 
येथे जमतात अलौकिक साधू संत महंत 
देवाला आयुष्य वाहिलेले कलंदर 
सत्याच्या शोधात सर्वस्वचा त्याग केलेले फकीर 
होय , बऱ्याचदा त्यांच्या बाह्य दर्शनाला
तुम्ही घाबराल दचकाल त्यांच्यापासून दूर सराल 
त्यांच्या धनलोभीपणा पाहून संशय ग्रस्त व्हाल
 किंवा मनातल्या मनात हसाल 
त्यांचे शक्तीप्रदर्शन वैभव पाहून थक्कीत व्हाल 
विरोधाभास पाहून मान खाली घालून हलवाल 

खरेच आपली तथाकथित सुसंस्कृतता 
तिथे थरारते भीतीने 
डोळ्यांना सवय नसलेली नग्नता बघून
नाक मुरडते सवयीने
त्या उग्र तामसी तापसी झुंडी पाहून 
आपल्यापासून सदैव दूर अलिप्त असलेला
तो अगम्य प्रवाह पाहून 

अन मग आपल्या रक्तातील अणूरेणूमधील 
ती विरागी गुणसूत्रे ही येतील वर उफाळून

तिथे आलेले सारेच नसतात आत्मज्ञानी 
वा  विचारापासून अन विकारापासून 
मुक्त झालेले योगी महात्मे स्वामी परमहंस
पण तो त्यांचा पथ अन ते त्यांचे जगणे 
स्तिमित करणारे असते सामान्य जनाला 
 त्या अफाट साधूंच्या मेळ्यात असतात 
अनेक सद्गुरु महागुरू श्री गुरु दडलेले 
घनदाट पानामधील सोनचाफ्याच्या फुलासारखे
ते त्यांचे अस्तित्व दिसत वा दिसतही नाही 
पण ते करत असतात 
अंतकरणशुद्धी देहशुद्धी लाखो भाविक जनाची
 ती गंगा ती यमुना ती अदृश्य भागीरथी 
हेच कुंभमेळ्याची खरे स्नान असते 
बाकी पाण्यात डुबकी मारणे वगैरे तर औपचारिकताच असते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

निवडूंग

निवडूंग ****** स्वार्थाच्या पायरीवर जेव्हा  उभी राहतात माणसं आणि मिळालेल्या क्षणाचं  रूपांतर करू पाहतात फक्त फायद्यात स्वार्थात ...