नोकरीचा प्रवास
************
हा प्रवास सुंदर होता या महानगरपालिकेतील नोकरीचा
हा प्रवास सुंदर होता
आणि या सुंदर प्रवासाचा हा शेवटही
अतिशय सुंदर झाला.
सारेच प्रवास सुखदायी नसतात
काही भाग्यवान प्रवासीच प्रवासाचे सुख अनुभवतात
प्रवास म्हटले की रस्ता ,रस्त्यावरील खाचखळगे अवघड वळणे
भांडखोर सहप्रवासी गर्दी हे अपरिहार्य असते
कधीकधी बरीच वाटही पाहावी लागते
तरी मनासारखी गाडी
मनासारखी ठिकाण मिळत नाही
ते तर माझ्याही वाट्याला आले.
पण तरीही मी खरंच भाग्यवान आहे .
मला या प्रवासात जे असंख्य सहप्रवासी भेटले
ते मला आठवत आहेत आनंद देत आहेत.
कुणाचा सहवास प्रदीर्घ होता
तर कुणाचा काही अल्प काळासाठी होता.
काही प्रवासी स्मृती मधून अंधुकही होत गेले आहेत तर कोणी जिवलग झाले आहेत
..
म्हणजे मी कुणाशी भांडलोच नाही
रागावलोच नाही असं नाही
साधारणत: या ३३ वर्षांमधील
दोन भांडणे मला नक्कीच आठवतात.
खरतर रागवणे हा माझा पिंड नाही
पण व्यवसायिक रागावणे हा तर
आपल्या जॉबचा एक हिस्साच असतो
ते एक छान नाटक असते
ते वठवावे लागते आणि ते वठवताना
आपण एन्जॉय करायचे असते
त्यात बुडून जायचे नसते
हे मला पक्के पणे कळले होते.
पण तो अभिनय करायचे संधी
मला क्वचितच मिळत होती.
आणि रागवण्यापेक्षाही
समजावण्याने आणि प्रेमाने सांगण्याने
माझे काम अधिक वेगाने
आणि अधिक चांगली झाली
असा माझा अनुभव आहे.
..
आणि समोरच्या माणसातील
अवगुणा पेक्षाही त्याच्यातील गुण दिसू लागले
आणि त्याचा वापर करता येऊ लागला
तर फायदा आपलाच होतो.
आणि बॉस बद्दल सांगायचे तर
मला इथे खोचक बोचक रोचक आणि टोचक असे सर्व प्रकारचे बॉस मिळाले .
ते तसे असणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता.
पण सर्व बॉस पासून
मी सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे
मला खोच बोज आणि टोच जाणवली नाही.
(अपवाद डॉ ठाकूर मॅडम . त्या अजात शत्रू असाव्यात)
इथे मला केवळ डॉक्टर मित्रच नाहीत तर
फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन क्लार्क नर्सेस
वार्ड बॉय टेक्निशियन आणि स्वीपर
यात ही मित्र भेटले.
आणि ही मैत्री केवळ परस्परांना दिलेल्या
आदर सन्मानावर अवलंबून होती.
मदतीला सदैव तयार असलेल्या
होकारावर अवलंबून होती.
..
तर या नोकरीच्या पर्वा कडे
मागे वळून पाहताना
या शेवटच्या दिवशी मला जाणवते
की आपण केलेली नोकरी छानच होती.
त्यामुळेच या कालखंडात भेटलेल्या
सर्व मित्र सहकारी वरिष्ठ यांच्यासाठी
मन आनंदाने प्रेमाने आदराने भरून येते.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️