वृक्ष
*****
रुजलेल्या झाडागत
प्रकाशाचे गाणे गात
गळेपर्यंत पानांची
आनंदे मी देतो साथ
अंधाराची खंत नाही
प्रकाशाची हाव काही
जगण्याला सादर मी
अवघा स्वीकार देही
येतात आणि जातात
सहा ऋतू आभाळात
थांबवणे लांबवणे
नाही मनी ना हातात
पार कुणी सजवले
कुणी वा ओरबाडले
कुणी दिले कुणी नेले
कोंब फुटतच राहिले
पण कधी मुळांनाही
ही माती निरोप देते
शिरातून वाहणारे
जीवनही थंडावते
जुने खोड हरवते
नवे बीज अंकुरते
नवे पक्षी नवे गाणे
त्याच जागी उमलते
माझे गाणे सरू आले
पोकळीत विसावले
सावलीचे सुर त्याचे
दिले जे ते देता आले
कुणा हाती फुल फळे
कुणा पाचोळा रे मिळे
आभाळात वृक्ष डोळे
उधळणे तया कळे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा