सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

वांच्छा

वांच्छा
******
या मनीचे हळू सांगतो 
आई तुझ्या मी कानात 
घे बांधुनी गाठोडे हे 
ठेव तुझ्या फडताळात 

फार काही भार नाही 
अडगळ थोडी होईल ही 
पायाखाली ठेव हवे तर 
भाग्य पदरी पडो ते ही 

घे  क्षणभर  उशाला वा
आसन करून  बसायाला 
तव कारणे देह पडावा 
आशिष देई या जन्माला 

कर पोतेरे सदनामधले 
देई दास्य घर पुसायला 
मी फक्त तुझाच व्हावा 
अन्य नसे वांच्छा मजला 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट

भेट **** पुन्हा एका वळणावर  भेटलोच आपण  अर्थात तुझ्यासाठी त्यात  विशेष काही नव्हतं  एक मित्र अवचित  भेटला एवढंच  माझंही म्हणशील ...