पावूस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पावूस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

पावूस परतीचा

पावूस परतीचा
**************
पाऊस परतीचा 
भिजलेल्या प्रीतीचा 
दान सर्वस्वाचे
देण्याच्या वृत्तीचा 

पाऊस परतीचा 
चार पाच दिसांचा
असंख्य भुरभुरत्या
मुलायम आठवांचा 

पाऊस परतीचा
अनावर ओढीचा 
निसटल्या क्षणांच्या 
हळुवार मिठीचा 

पावूस परतीचा
भिजलेल्या मातीचा
फोफावल्या गवतात 
बहरल्या स्वप्नांचा 

परतीच्या पावसात 
मन भरे काठोकाठ
अलगद ओघळते
काही दाटलेले आत

परतीच्या पावसात 
चिंब भिजून घेतो  
अन् गीत राहिलेले 
पुन्हा गावून घेतो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १५ जुलै, २०२५

पडणाऱ्या झाडास

पडणाऱ्या झाडास
************

झाड पडू आले झाडा कळू आले 
वेलीनी सोडले बंध सैल

आले घनघोर कुठले वादळ   
उपटली मूळ अर्ध्यावर 

कुठल्या सरीने देह कोसळेल 
लढाई सरेल जीवनाची 

कुठे वनदेव कुठे वनराणी 
गेली विसरूनी आज तुला

अरे पण थांब फुलल्यावाचून 
असा कोमेजून जावू नको

पडल्या वाचून थांब प्रिय वृक्षा 
गिळूनिया वक्षा व्यथा तुझी 

नाहीतर मग पाऊस थांबेन 
करपून रान जाईन सारे

खुरटेल बीज होत तगमग
आकसेल जग वनाचे या

नको सांगू तुझे दुःख पावसाला
पुन्हा रुजायला लाग त्वरे 

तुझी जिजीविषा दिसू दे जगाला
अन पावसाला पुनःपुन्हा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 





शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

अक्षर

अक्षर
*****
आभाळात घन जीवन भरले 
मातीवरती अलगद पडले 
पोर इवले अंगणामधले 
रडे विसरून हसू लागले 

त्या हसण्याचे सोन कवडसे 
झाड होत एक नभात घुसले 
शाळा हिरवी अंगण हिरवे 
पुस्तक पाटी हिरवी झाले 

पाहता पाहता हिरवाईला 
सुंदर मधुर फळ लागले 
फळात होती अनंत शून्ये 
अनंत अक्षर गुपित दडले 

अक्षर जीवन अक्षर स्वप्ने 
अक्षरात मन हरवून गेले 
सोपे करुनी किती सांगावे 
आरश्यात रे  चित्र उमटले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...