रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

जीवन जरा व मृत्यू

जीवन व जरा
***********
जीवना पथाला चालून म्हातारा
थकला बसला घडीभर
पाहतो जगाला पाहतो मनाला 
घट्ट चिकटला घरादारा
म्हाताऱ्याला जरी आता मोह नाही
धन लोभ काही  उरलेला 
परी माझे पण तया टाकवेना 
मुठ ती सुटेना काही केल्या 
थकल्या देहात तेच असे मन 
सुखाचे चांदणं वेचणारे 
शाप वृद्धत्वाचा असा जीवनाला 
कधी कुणी दिला कळेनाच
पान पिकूनिया हवे का गळाया 
वाट ती पहाया झडण्याची 
तया पडण्याची भय चिंता नाही 
पिकणे तरीही पटेचि ना 
नसे तो ययाती नसे वा गजनी 
जातांना संपूनी लोभ तृष्णा 
परंतु जरा ही नसावी जीवना 
शाप अर्था विना वाटे जणू
हळूच विझावा  दिवा पेटलेला
प्रकाश जगाला वाटतांना 
नको तडफड नको तगमग 
नको भगभग देह मना 
डाव अखेरचा ऐसा हा घडावा 
चंद्रास्त भिडावा पहाटेला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२६

अंगणात


अंगणात
******
अंगणात तुझ्या येणार मी नाही
दारात उगाच थांबणार नाही
लाडीगोडी मुळी लावणार नाही 
उगा गुण गाण गाणार ही नाही 

वाटते का तुला रुसलो जरासा 
येईल माघारी टाकत उसासा
बहुदा नसेल तुला तीही पर्वा 
डोंगर दरीत घुमतो पारवा 

तुज का कृपण म्हणू मी उगाच 
कृपा पात्र तुझे दिसे खचाखच 
कदाचित खरी नसेल ही प्रीती 
हव्यासाची स्वार्थी असेल वा वृत्ती 

असेल ते असो तुज काही दिसो 
मिटलेले स्वप्न माझे मज हसो
पण 
अंगणात तुझ्या आता येणे नाही 
दारात धावणे घडणार नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

हौस

हौस
****
रित्या अंतरात रिताच कल्लोळ 
शून्याचा महाल शून्यातच 

त्याच त्या सुखाचा उठे पडसाद 
जीर्ण अवसाद घेऊनिया 

कोसळती उल्का कळल्यावाचून 
जातात जळून क्षणार्धात 

फाटलेले वस्त्र तारा कुंपणात 
फडफडे त्यात महासुख 

जगणे जगाचे निरर्थ वाहणे 
आणिक सरणे एका दिसी  

विक्रांत वाहतो तैसाच जगात 
खेळ हा पाहत क्षणोक्षणी 

परी जगण्याची हौस ही फिटेना 
वेगळा होईना काही केल्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

सीताराम चहावाला

सीताराम चहावाला 
***
सीतारामच्या हाताचा 
तो खूप उकळलेला 
काहीसा कडवट घट्ट गोड 
पाच सहा घोटात संपणारा 
चहा पिता पिता 
कितीतरी सकाळ आणि 
संध्याकाळ गेल्या होत्या 
कामाची सुरुवात आणि 
कामाची सांगता झाली होती 

तो चहा सितारामचा चहा 
मला हिमालयाच्या गुहेत 
जरी आणून दिला तरी 
मी ओळखीन इतका तो
जिभेच्या मुळाशी जाऊन बसला होता

पण तो चहा बनवणारा मात्र 
जाऊन बसला आहे 
त्या आदी अंत नसलेल्या शून्यात 

सिताराम ची कौटुंबिक माहिती 
असल्याचे काही कारण नव्हते 
त्याच्या स्वभावाची चिकित्सा 
करायची ही गरज नव्हती 

तरीही प्रेमाने चहा पाजणारा 
आणि पैशाची वाट ही 
न पाहता निघणारा  
लगबगीने चालणारा सिताराम 
डोळ्या पुढे येतो 

तसे तसे वजन जास्त नव्हते 
वय पन्नाशीच्या आसपास असावे 
काटक शरीरयष्टी नेटकी राहणी 
तो अगरवाल हॉस्पिटलच्या 
गेटचा अविभाज्य हिस्सा होता
 
आता एम .टी .आगरवाल मधील 
एक एक चेहरे हरवून जात आहेत 
निवृत्त होत प्रमोशन मिळवत 
दूर जात आहेत 
हळूहळू एक नवीन जग 
तिथे उभे राहत आहे 
एका लाटे  नंतर दुसरी लाट येते
 दुसरी गेली कि तिसरी येते
जीवनाचा हा प्रवाह अनुस्युत आहे 
कदाचित आणखीन दहा-पंधरा वर्षांनी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कोणी
ओळखणार सुद्धा नाही .

हा विचार आल्यावर  वाटायचे कदाचित 
त्या गेट मध्ये उभा असलेला सिताराम 
तरी आपल्याला ओळखेन
आनंदाने हाक मारेन अन प्रेमाने चहा पाजेन
आणि पैशासाठी खिशात घातलेला हात 
वरती ही काढू देणार नाही .

पण आता ती ही वेळ येणार नाही 
याची खिन्नता वाटते .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६

चित्र



चित्र
*****
तुझ्या डोळ्यावरील 
अर्ध पारदर्शक काचा मधून 
नाही वाचता येत मला तुझे डोळे अजून 
ती तुझी गंभीर आत्ममग्न मुद्रा 
राहते समोर एक प्रश्नचिन्ह होऊन 

तो सूर्य असतो मावळतीच्या क्षितिजावर 
अन् ते स्वर्ण रंग विखुरलेले तुझ्या केसावर 
तरीही येणाऱ्या अंधाराची चाहूल 
असते तुझ्या चेहऱ्यावर 
आणि लाखदा डोळ्यात साठवलेली तुझी भावमुद्रा 
प्रत्येक वेळी ठाव घेते माझ्या हृदयाचा 

तो किनारा तो वारा तसाच आहे अजून 
ती वाळू ती वर्दळ वाहत असते अजून 
पण त्या फ्रेम मध्ये नसतेस आता तू 
आणि पर्याय नसतो मलाही
घेण्याशिवाय डोळे मिटून
तेव्हा ते चित्र  होते पूर्ण
अन  ते  तुझे गूढ गंभीर अस्तित्व
 राहते मला व्यापून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

आळंदीत . .

आलो आळंदीत 
************
आलो आळंदीत झालो आनंदीत 
देव समाधीत पाहियला 

भारावले तन भारावले मन 
गर्जे कणकण ज्ञानदेव 

जिवलग भेटी हरपले भान 
हृदयात गाणं गुंजो आले 

माऊली माऊली ज्ञानाई माऊली 
अंतरी फुटली मेघमाला 

विक्रांत लेकरू माती मळलेले
परी झेपावले कुशीमध्ये 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे
*********
माझ्या मधले   शब्द कोवळे 
झाले मोकळे    तुझ्यामुळे 

कधी कुठली    फांदी झुकली 
बहरून आली   तुझ्यामुळे 

खोल अंतरी     होत्या गोष्टी 
आल्या ओठी    तुझ्यामुळे 

माझे मी पण    आले उमलून 
जीवन घेऊन    तुझ्यामुळे 

तुज ना कळले   स्पर्श रूजले
अन हे घडले      तुझ्यामुळे

या ओठावर      अजून अंमळ 
होते थरथर      तुझ्यामुळे 

गात्र वीणेत      किंचित कंपण
जीवित अजून   तुझ्यामुळे

तव स्मृती मी    जगतो म्हणूनी
जिवंत अजुनी   तुझ्यामुळे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

जीवन जरा व मृत्यू

जीवन व जरा *********** जीवना पथाला चालून म्हातारा थकला बसला घडीभर पाहतो जगाला पाहतो मनाला  घट्ट चिकटला  घरादारा म्हाताऱ्याला जरी...