मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

भुक्कड स्वप्ने









काय साली भुक्कड स्वप्ने
इथे पाहिली आहे मी
प्रेमासाठी चक्क गटारी  
वस्ती केली आहे मी

उगाच जळलो रात्रंदिनी
क्षणोक्षणी जागुनी मी
अन सुखाची प्रेतं छिन्न  
उंच लटकावली आहे मी  

तिची नजर होती फक्त
फुगत्या बँक बँलंसवरी नि
कंगाल होवुनी जिंदगी ही
वाया घालविली आहे मी

रे सुटुनी हातातील सारे
उभा नग्न भिकारी मी
आता नको करुणा कुठली  
ती वस्ती सोडली आहे मी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, ६ एप्रिल, २०१५

पावूस



आणखी पन्नास वर्षांनंतर
पावूस असा नाही पडणार  
कुठे कमी तर कुठे जास्त
मर्जी त्याची नाही चालणार
  
आकाशात होतील कालवे
मेघ अडविण्या वातद्वार
हवा तिथे हवा तेवढाच
पावूस पडेल धुवांधार

अशी जादू विज्ञानाची
दुनिया नक्की पाहणार
भगीरथाचे वंशज आम्ही
ही किमया साधणार

गळा कुणी ना बांधेल दोर
कुणी कधी ना जहर पिणार
कुठले ना घर उजाड होणार
हसेल स्वप्न हिरवेगार  

पाण्याचा न होईल व्यापार 
नसेल सावकार ना लुटमार
बळी राजा माझा इथला
राज्य वरुणावर करणार  



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
  




रविवार, ५ एप्रिल, २०१५

मी जगलोच नाही






इतकी वर्ष इथे आहे मी
इथला कधी झालोच नाही

किती पहिले देश दुरुनी
कुठे कधीही टिकलोच नाही

कथा वादळी कशी कळावी
सागरा जर भिडलोच नाही

सदा सांभाळी बूट विदेशी
कधी देवळी शिरलोच नाही

जगुनिया काडेपेटीत संपलो
अंगार कधी झालोच नाही

हा फेकावा जन्म म्हणे मी
भीतीने धजावलोच नाही

मरणे ते तर दूर राहिले
अजूनी मी जगलोच नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

तू नाही म्हणाली त्याला..







वीस वर्ष झाली
तू नाही म्हणाली त्याला
पण कालच घडल्यागत
तो प्रसंग
उंचावरून दरीत पडल्याचा
तो अनुभव  
शब्द सुचत नव्हते तेव्हा
भावना झाल्या होत्या दग्ध
आणि तो स्पोर्टली घेतल्याचा
माझा सपशेल नाटकी अभिनय

आता मला तुझी स्वप्न पडत नाही
(झोपही नीट लागत नाही
वाटत वय झालय)
तुझे सुख दिसते दुरून
अन माझेही बरे चाललेय
पण हा दिवस
अन ही तारीख
हटकून आठवण आणते
साऱ्या जगाचे वाढदिवस
विसरणारा मी
आत स्मृतीची घंटी वाजते

जर तरचा हिशोब
आता मनात उमटत नाही
डोळ्यात पाणी मन हळवे
काही काही होत नाही
पण या तारखेचे अन
या आठवणीचे काय करायचे
मला खरच कळत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...